Ishan Kishan Record: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा टी-२० सामना हॅमिलटनमध्ये सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण श्रेयस अय्यर आणि इशान किशनने अर्धशतकं झळकावून भारतीय संघाचा डाव सावरला. इशान किशन ६१ धावांची खेळी करून माघारी परतला. या खेळीच्या बळावर त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. इशान किशन हा टी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
इशान किशन या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ज्यावेळी तो फलंदाजीसाठी आला, त्यावेळी भारतीय संघाचा डाव फसलेला होता. कारण अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान इशान किशनने २८ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. इशान किशनने आतापर्यंत २०२६ मध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक १२२० धावा केल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये त्याने भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये फलंदाजी करताना ११६४ धावा केल्या होत्या. तर अभिषेक शर्माच्या नावे २०२६ मध्ये ११५३ धावा करण्याची नोंद आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
इशान किशन- १२२० धावा (२०२६)*
सूर्यकुमार यादव- ११६४ धावा (२०२२)
अभिषेक शर्मा- ११५३ धावा (२०२६)
इशान-श्रेयसची भागीदारी
भारतीय संघाला पहिल्या डावात फलंदाजी करताना अवघ्या १९ धावांवर २ मोठे धक्के बसले होते. त्यावेळी इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९३ धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. यादरम्यान इशानने ६१ तर श्रेयस अय्यरने ५० धावांची खेळी केली.
