Ishan Kishan Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ब्लॉकबास्टर सामन्याला सुरूवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण त्यानंतर इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना इशान किशनने ७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर इशान किशन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली. या दोघांकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शून्यावर माघारी परतला. याआधी झालेल्या सामन्यात तो गोल्डन डकवर माघारी परतला होता. या सामन्यात तो ४ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतल. त्यामुळे इशान किशनवर चांगली सुरूवात करण्याची जबाबदारी होती. त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. यादरम्यान इशान किशनने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो भारत- पाकिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरा सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोहम्मद हफीज अव्वल स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये अहमदाबादमध्ये खेळताना २३ चेंडूत आपलं अर्धशतक पू्र्ण केलं होतं. तर २०२५ मध्ये दुबईत झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने २४ चेंडूत वेगवान अर्धशतकी खेळी केली होती. आता इशान किशनने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामन्यत २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर २०१२ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात युवराज सिंगने २९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.
भारत- पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज
मोहम्मद हफीज-२३ चेंडूत, अहमदाबाद, २०१२
अभिषेक शर्मा- २४ चेंडूत, दुबई, २०२५
इशान किशन- २७ चेंडूत, कोलंबो, २०२६*
युवराज सिंग- २९ चेंडूत, अहमदाबाद, २०१२
