Ishan Kishan Duleep Trophy Final Double Century Record: दुलीप करंडक २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यात खेळवला जात आहे. इशान किशन पूर्व विभाग संघाचा कर्णधार आहे तर तिलक वर्मा दक्षिण विभाग संघाचं नेतृत्त्व करत आहे. या सामन्यात पूर्व विभागाच्या संघाचं पारडं जड आहे. ईस्ट झोनने इशान किशनच्या द्विशतकी आणि दुसऱ्या डावातील ८० धावांच्या खेळीच्या बळावर धावांचा मोठा डोंगर उभारला आहे. यादरम्यान इशान किशनने मोठा विक्रम आपल्या नावे केला.

दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, इशान किशनने उत्कृष्ट कामगिरी केली. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात, त्याने पहिल्या डावात २७० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ९८ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. यासह त्याने अंतिम सामन्यात एकूण ३५० धावांची विक्रमी खेळी साकारली.

दुलीप करंडकमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा यष्टिरक्षक फलंदाज असा विक्रम त्याने द्विशतकी खेळीसह आपल्या नावे केला होता. यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून इशानने इतिहास घडवला. आता या स्पर्धेतील एका सामन्यात (दोन्ही डावांत मिळून) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे; एकूण ३५० धावा करून त्याने १६ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

इशान किशनने मोडला दिनेश कार्तिकचा विक्रम

इशान किशनने दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३५० धावा केल्या आहेत. त्याने दिनेश कार्तिकचा विक्रम मोडला; कार्तिकने २००६ मध्ये पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभागाकडून खेळताना ३५० धावा केल्या होत्या. रमण लांबा यांनी १९८७ मध्ये दक्षिण विभाग विरुद्ध उत्तर विभागासाठी ३२० धावा केल्या होत्या. युसूफ पठाणने २०१० मध्ये दक्षिण विभागविरुद्ध पश्चिम विभागासाठी ३१८ धावा केल्या होत्या. के.एल. राहुलने २०१४ मध्ये सेंट्रल झोनविरुद्ध साऊथ झोनसाठी ३१५ धावा केल्या होत्या.

दुलीप ट्रॉफीतील एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

इशान किशन – ३५० धावा, २०२६
दिनेश कार्तिक – ३३३ धावा, २०१०
रमण लांबा – ३२० धावा, १९८७
युसूफ पठाण – ३१८ धावा, २०१०
केएल राहुल – ३१५ धावा, २०१४

दुलीप करंडक अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेर पूर्व विभाग संघाने ५ विकेट्स गमावत २१२ धावांचा डोंगर उभारला आहे. यासह पूर्व विभागाकडे आतापर्यंत ५८४ धावांची आघाडी झाली आहे. पाचव्या दिवशी आता नेमका काय निकाल लागणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.