Ishan Kishan Statement After POTM Award: इशान किशनच्या ७० धावांच्या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. चेपॉकच्या अवघड खेळपट्टीवर जिथे धावा करणं सोपं काम नव्हतं तिथे इशानने सावध आणि परिणामी आक्रमक खेळीने एका टोकाला टिकून राहिला. इशान किशनने सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना तो अखेरीस भावुक झाला होता.
इशान किशनच्या ७० धावांच्या मॅचविनिंग खेळीमुळे हैदराबादचा संघ हा सामना जिंकू शकला. इशानने या सामन्यात ४७ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. इशानच्या या खेळीच्या बळावर हैदराबादने १९ षटकांत १८१ धावांचं लक्ष्य सहज गाठलं.
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर इशान किशन काय म्हणाला?
इशान किशनला या मॅचविनिंग खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर इशान किशन म्हणाला, “मी विकेटकीपिंग करत असताना मला सतत जाणवत होतं की ही खेळपट्टी अजिबात सोपी नाही. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं खूप कठीण जाणार आहे, असंच मला वाटत होतं. विशेषतः फिरकी गोलंदाज आणि संथ चेंडूंना चांगली मदत मिळत होती.”
“पण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून माझ्या मनात एकच गोष्ट होती, सामना शेवटपर्यंत खेळून संघाला विजय मिळवून द्यायचा. कारण शेवटच्या टप्प्यात नवीन फलंदाजांसाठी एकीकडे सिंगल्स घेणं आणि दुसरीकडे चौकार-षटकार मारणं खूप अवघड होतं. त्यामुळे मी शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहण्यावर लक्ष केंद्रित केलं. अशा खेळपट्टीवर खेळताना फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण सामना जिंकू शकतो, हा विश्वास मनात हवा. कोणत्याही क्षणी स्वतःवर शंका घेता कामा नये,” असं इशान म्हणाला.
इशान पुढे म्हणाला, “मी फक्त साधा खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि शक्य तितकी षटकं खेळायचं ठरवलं. डावखुरा फलंदाज असल्यामुळे गोलंदाजांना प्रत्येकवेळी योग्य लाईन-लेंथ टाकणं सोपं नसतं, याचाही फायदा झाला. त्यामुळे मी शांत राहून शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला. क्लासेनसोबत फार काही चर्चा झाली नाही. आम्ही दोघंही आपापले नैसर्गिक फटके खेळत होतो.”
इशान किशनने कोणासाठी जिंकला चेन्नईविरूद्धचा सामना?
“पण माझ्यासाठी आजची खरी प्रेरणा वेगळीच होती. माझा चुलत भाऊ मैदानात उपस्थित होता. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याची बहीण गमावली होती. आमच्या कुटुंबासाठी तो खूप कठीण काळ होता आणि आज पहिल्यांदाच ते सगळे मैदानात सामना पाहायला आले होते. म्हणूनच मला त्यांच्यासाठी हा सामना जिंकून द्यायचा होता. त्यांनी ही खेळी प्रत्यक्ष पाहिली आणि मी सामना जिंकून देऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे,” असं म्हणत इशान किशन भावुक झाला.
“आज मला वरून कुणाचा तरी आशीर्वाद मिळत असल्यासारखं वाटत होतं. मनात एक वेगळी ताकद जाणवत होती, ‘मी संघासाठी शेवटपर्यंत उभा राहिलो, तर आपण नक्की पात्र ठरू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यालाही याचा खूप आनंद झाला असेल,” असं म्हणत इशान किशनच्या डोळ्यात अश्रू तरळले.
