Ishan Kishan Record: गेल्या काही वर्षांत टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आधी सूर्यकुमार यादव, मग त्यानंतर अभिषेक शर्माने आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या यादीत नंबर १ स्थानी कब्जा केला होता. पण आता इशान किशनने अभिषेक शर्माला धक्का दिला आहे. इशान किशन आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. २७ वर्षीय इशान किशनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. नंबर १ स्थानी पोहोचताच इशान किशनच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
इशान किशनने टी-२० आंतरराष्ट्रीय पुनरागमन केल्यानंतर दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत त्याने ३१७ धावा केल्या होत्या. यादरम्यान पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता.या स्पर्धेत तो संजू सॅमसननंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी रँकिंगमध्ये ८७६ रेटिंगसह अभिषेक शर्माला मागे टाकून अव्वल स्थानी पोहोचला आहे.
एमएस धोनीच्या मोठ्या रेकॉर्डशी केली बरोबरी
आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचताच इशान किशनने एमएस धोनीच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. इशान किशन हा आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचणारा दुसराच भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. याआधी एमएस धोनीने २००६ मध्ये आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये नंबर १ स्थानी कब्जा केला होता. आता इशान किशन अशी कामगिरी करणारा दुसराच भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
इशान किशनने ७ रे़टिंग पॉईंट्सने अभिषेक शर्माला मागे टाकलं आहे. तर अभिषेक शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. या यादीत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्ट चौथ्या स्थानी आणि श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका या यादीत पाचव्या स्थानी आहे. इशान किशनने २०२१ मध्ये अहमदाबादच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत ४७ डावात २९.१५ च्या सरासरीने १३४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १० अर्धशतकं झळकावली आहेत.
