Sakib Hussain Reveals Ishan Kishan Gives him 6 pairs of spike Shoes: सनरायझर्स हैदराबादचा संघ एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर स्पर्धेबाहेर झाला. राजस्थान संघाने हैदराबादला या सामन्यात पराभूत केलं. पण या हंगामात हैदराबाद संघाला दोन उत्कृष्ट गोलंदाज मिळाले, ते म्हणजे साकिब हुसैन व प्रफुल्ल हिंगे. दोन्ही गोलंदाजांनी पदार्पणाच्या सामन्यात आणि नंतर उर्वरित हंगामात आपल्या कौशल्याची छाप पाडली. दरम्यान साकिब हुसैनने स्पर्धेतनंतर इशान किशनबाबत मोठा खुलासा केला आहे.
हैदराबादने साकिब हुसैनला ३० लाख रुपयांना संघात घेतलं आणि संघातील वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्याला संधी देण्यात आली. साकिबने १३ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्याच सामन्यात चार बळी घेतले. त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल चर्चा सुरू झाली असताना, एक जुना व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की त्याच्या आईने त्याला स्पाइक शूज विकत घेण्यासाठी आपले दागिने विकले होते. आता त्याने खुलासा केला आहे की, इशान किशनने त्याला या सीझनमध्ये स्पाइक शूजच्या ६ जोड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.
ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत साकिब हुसेनने खुलासा केला की, इशान किशनने त्याला स्पाइक शूजच्या सहा जोड्या भेट म्हणून दिल्या होत्या. २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने साकिब हुसैनला संघात घेतलं, पण त्याला पदार्पण करता आलं नाही. त्यानंतर केकेआर फ्रँचायझीने एक मुलाखत घेतली, ज्यात साकिबने घरच्या हालाखीच्या परिस्थितीतही क्रिकेटचं स्वप्न कसं पूर्ण केलं हे सांगितलं. त्याला स्पाइक शूज हवे होते, ज्यांची किंमत १०,००० ते १२,००० रुपये होती. तो त्यासाठी रडायचा आणि त्याच्या आईने त्याला ते शूज विकत घेण्यासाठी आपले दागिने विकले होते.
साकिब म्हणाला, “सध्या माझ्याकडे स्पाइक्ड शूजच्या सहा जोड्या आहेत. इशान भाईने त्या मला आणून दिल्या. त्याने मला विचारलं की तुला कोणते शूज हवे आहेत, मी त्याला सांगितलं ॲडिडास ॲडीपॉवर सांगितले. म्हणून त्याने त्या मला त्या शूजच्या ६ जोड्या आणून दिल्या.” साकिबने यावर्षी सनरायझर्स हैदराबादकडून ११ सामने खेळले असून, पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करून त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली.
साकिब हुसेनने आयपीएल २०२६ मध्ये ११ सामन्यांमध्ये एकूण १५ बळी घेतले. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात २४ धावा देऊन ४ बळी घेतले. मात्र, एलिमिनेटर सामन्यात साकिबला एकही बळी घेता आला नाही आणि त्याने आपल्या ४ षटकांत ५२ धावा दिल्या. याशिवाय पदार्पणापासून आयपीएलमधील प्रत्येक सामन्यात विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.
