Ishan Kishan Bowling Video viral: भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण यादरम्यान भारताचे अनेक खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. काऊंटीमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यादरम्यान इशान किशन त्याची फलंदाजी नाही तर गोलंदाजीमुळे तो सध्या चर्चेत आहे. इशान किशनच्या गोलंदाजीमध्ये अनेक दिग्गजांची गोलंदाजी अॅक्शन पाहायला मिळाली आहे.
काउंटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील पहिल्या २ डावांमध्ये त्याने अनुक्रमे ८७ आणि ७७ धावा केल्या आहेत. यानंतर त्याने गोलंदाजीमध्ये आपला हात आजमवला. ज्यामध्ये त्याने ६ वेगवेगळ्या गोलंदाजी अॅक्शनसह ६ चेंडू टाकले. ज्याचा व्हीडिओ काऊंटी चॅम्पियनशिपच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
सोमरसेट विरुद्धच्या सामन्यात इशान किशन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने षटकातील पहिला चेंडू हरभजन सिंगच्या अॅक्शनने टाकला. नंतर तर तो दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची नक्कल करत लेग-स्पिन गोलंदाजी करतानाही दिसला. खरंतर, या सामन्यात किशन विकेटकीपिंग करत होता, पण डावाच्या मध्येच दुसऱ्या खेळाडूला ग्लोव्हज दिले आणि चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी पोहोचला.
ईशान किशन विकेटकिपिंग सोडून गोलंदाजीसाठी पोहोचताच चाहत्यांना धोनीची आठवण आली. २०१४ मध्ये धोनीने पण अचानक ग्लोव्हज काढून गोलंदाजी करताना दिसला होता. इशान किशनने ६ चेंडू ६ वेगवेगळ्या गोलंदाजी अॅक्शनमध्ये केले आहेत. चाहत्यांनीही इशानच्या या व्हीडिओवर खूप कमेंट्स केल्या आहेत.
गेल्या वर्षी बीसीसीआयने ईशान किशनला केंद्रीय करार यादीतून वगळले होते, परंतु २०२५-२६ हंगामासाठी त्याला पुन्हा केंद्रीय करार यादीत समाविष्ट करण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही, परंतु आता त्याने काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय कसोटी संघात पुनरागमनाचा दावा केला आहे.
इशान किशनने टीम इंडियाकडून शेवटचा सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळताना दिसला होता. आतापर्यंत त्याने त्याच्या २७ एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत ९३३ धावा, ३२ टी-२० सामन्यांमध्ये ७९६ धावा आणि २ कसोटी सामन्यांमध्ये ७८ धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक शतक आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत.