दोन वर्षांपूर्वी बीसीसीआयने फटकारलेला इशान किशन दमदार खेळी, दर्जेदार यष्टीरक्षण आणि सक्षम नेतृत्व या बळावर टीम इंडियाचा नवा पोस्टरबॉय होण्याची लक्षणं आहेत. चेन्नईत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलच्या मुकाबल्यात इशानने २७० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. दक्षिण विभागाच्या दर्जेदार आक्रमणाविरुद्ध खेळताना इशानने ३० चौकार आणि ७ षटकार लगावले. इशान पूर्व विभागाचं नेतृत्वही करतो आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद पूर्व विभागाच्या हातून निसटू नये यादृष्टीने इशानची खेळी निर्णायक आहे.
भारताच्या टी२० संघाचा अविभाज्य भाग असलेला इशान आता कसोटी आणि वनडे संघातही स्थान पटकावण्याच्या शर्यतीत आहे. चेन्नईच्या प्रचंड उकाड्यात दोन दिवस फलंदाजी करत शारीरिक आणि मानसिक कणखरता सिद्ध केली.
२८ फेब्रुवारी २०२४ रोजी बीसीसीआयने वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आलं होतं. श्रेयसच्या फिटनेससंदर्भात स्पष्टता नसल्याने तर इशानने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्याने त्यांचा यादीत समावेश करण्यात आला नाही. वनडे प्रकारात द्विशतक नावावर असणारा इशान हा ऋषभ पंतनंतर विकेटकीपिंगसाठी प्रथम प्राधान्य होता. मात्र आयपीएलसाठी तय्यार राहण्यासाठी इशानने झारखंडसाठी खेळणं सोडून दिलं. बीसीसीआयला इशानचं हे वागणं पसंत पडलं नाही. डोमेस्टिक क्रिकेटला प्राधान्य द्या सांगितलेलं असतानाही इशानच्या या कृतीने बीसीसीआयने कारवाई केली.
करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडल्याने भारतीय संघनिवडीवेळी प्राधान्याने त्याच्या नावाचा विचार होणार नाही हे स्पष्ट झालं. इशानच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. दुसऱ्याच कसोटीत जुरेलने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. अपघात आणि रिहॅब प्रक्रियेनंतर भारतीय संघात परतलेला ऋषभ पंत, धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियाची दारं किलकिली झालेला ध्रुव जुरेल आणि संघाची गरज लक्षात घेऊन यष्टीरक्षण करणारा लोकेश राहुल अशा तीव्र स्पर्धेमुळे इशान कसं पुनरागमन करणार याबाबत साशंकता होती.
इशानने खणखणीत खेळ आणि नेतृत्वातून निवडसमितीला दखल घ्यायला भाग पाडलं. इशानच्या नेतृत्वात झारखंड संघाने २०२५-२६ हंगामात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. झारखंडचं या स्पर्धेचं हे पहिलंच जेतेपद आहे. हरयाणाविरुद्धच्या फायनलच्या मुकाबल्यात इशानने ४९ चेंडूत १०१ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये १० षटकारांचा समावेश होता. या स्पर्धेत इशानने १० डावात १९७च्या स्ट्राईकरेटसह ५१७ धावा केल्या. या स्पर्धेदरम्यान इशानने त्रिपुराविरुद्ध ५० चेंडूत ११३ धावांची खेळी केली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक शतकं (५) झळकावणाऱ्या विक्रमाची त्याने बरोबरी केली.
या कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इशानची भारतीय टी२० संघात निवड करण्यात आली. वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलला संघातून वगळण्यात आलं. इशानने चांगला खेळ करत निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला. यंदा झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल यांच्याऐवजी इशानच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं. या स्पर्धेतही इशानने चांगली कामगिरी केली.
आधी तो काहीसा बालिश वागायचा. आता तो परिपक्व झाला आहे. त्याच्या खेळातल्या कच्च्या दुव्यांवर त्याने काम केलं. तो संघाची मोट बांधू शकतो हे त्याने दाखवून दिलं आहे. त्याच्या खेळाबाबत तो सखोल विचार करतो, आधी लोक त्याला चुकीचं समजायचे. आता तो अधिक सर्वसमावेशक झाला आहे असं झारखंडचा माजी फलंदाज इशांक जग्गीने सांगितलं.
‘त्याची मानसिक कणखरता वाखाखण्याजोगी आहे. संघ अडचणीत असताना त्याने स्वत:च्या खेळातून आदर्श निर्माण केला आहे. तो परिस्थितीपासून पळ काढत नाही. आयपीएलमध्ये पैसा मिळू लागल्यानंतर खेळाडूंचं वागणं बदलतं असं म्हणतात. करार यादीतून वगळलं गेल्यानंतर इशानने आव्हान स्वीकारलं आणि सिद्ध केलं. पुनरागमन केल्यानंतर इशानने गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत १११ धावांची खेळी केली. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर इशानने विचारपूर्वक निर्णय घेतले. उत्कर्ष सिंगऐवजी विराट सिंगला सलामीला पाठवण्याचा निर्णय त्यानेच घेतला. स्ट्राईकरेटचं महत्त्व त्याने खेळाडूंच्या मनावर बिंबवलं’, असं इशांकने सांगितलं.
इशांकच्या म्हणण्याला झारखंडचा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राने दुजोरा दिला. माझ्या गोलंदाजीवर धावा निघाल्या तरी तो शांत असतो, त्याच्या पाठिंब्यामुळेच आम्ही गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकतो असं सुशांतने सांगितलं.
