Indian Cricketers With Government Jobs: भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज इशान किशन सध्या तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपू्र्वी झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याने दमदार फलंदाजी केली होती. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी राहिला होता. पण यावेळी तो आपल्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या तो क्रिकेटमधून मिळालेल्या ब्रेकदरम्यान अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडताना दिसून आला आहे. तो भारतासाठी क्रिकेट खेळत असला, तरीदेखील आरबीआयसाठी शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. केवळ इशान किशन नव्हे, तर आणखी काही भारतीय खेळाडू आहेत जे शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कोण आहेत खेळाडू? जाणून घ्या.
उमेश यादव
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नागपूर कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२३ मध्ये तो भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत त्याला ही नोकरी मिळाली होती.
युझवेंद्र चहल
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. चहलने आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, पण त्याला भारतीय संघात स्थान दिलं जात नाहीये. २०१८ मध्ये त्याची स्पोर्ट्स कोट्यातून आयकर निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
केएल राहुल
उमेश यादवसह भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलची देखील २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बंगळुरू प्रादेशिक कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केएल राहुलची देखील स्पोर्ट्स कोट्यातून निवड करण्यात आली आहे.
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचा सदस्य होता. वर्ल्डकप जिंकून भारतात परतल्यानंतर, सिराजने ऑक्टोबर २०२४ मध्ये तेलंगणा पोलिसमध्ये पोलिस उपअधिक्षक ( डीएसपी) म्हणून अधिकृत पदभार स्वीकारला. सिराजने पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पदभार स्वीकारला.
इशान किशन
तसेच इशान किशन हा रिझर्व्ह बँकेच्या पटना येथील कार्यलयात सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच तो आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून आला होता. आता कुठलीही टी-२० मालिका नसल्याने त्याने पटना कार्यालयात हजेरी लावली आहे.
