Ishan Kishan on Kirti Azad: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६चं जेतेपद पटकावल्याने देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. पण या जल्लोषाच्या वातावरणादरम्यान भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारताच्या १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू किर्ती आझाद यांनी भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली, या वक्तव्यावर इशान किशन वैतागला आहे, काय म्हणाला जाणून घेऊया.

अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंड संघाता ९६ धावांनी पराभव करत विश्वचषक ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह व बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया टी-२० विश्वचषक ट्रॉफी घेऊन हनुमान टेकडी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, ज्याचा व्हीडिओदेखील समोर आला होता. हा व्हीडिओ पाहून किर्ती आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कीर्ती आझाद म्हणाले होते की, टीम इंडियाला लाज वाटायला हवी. खेळ आणि ट्रॉफी कोणत्याही एका धर्माचे नाही तर संपूर्ण राष्ट्राचे आहे. संघात प्रत्येक धर्माचे खेळाडू आहेत, मग ट्रॉफी फक्त एकाच मंदिरात का नेण्यात आली? ती मशीद, चर्च किंवा गुरुद्वारात का नेण्यात आली नाही? कीर्ती आझाद म्हणाले की, टीम इंडिया केवळ सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत नाही तर संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करते आणि त्या संघात प्रत्येक धर्माचे खेळाडू आहेत.

आता संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक विजयानंतर पटनाला परतलेल्या इशानला माध्यमांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारला होता. पण, हा प्रश्न ऐकून इशान संतापला आणि म्हणाला, “आम्ही किती कमाल कामगिरी करत विश्वचषक जिंकला. तुम्ही पण काहीतरी चांगले प्रश्न विचारले पाहिजेत. कीर्ती आझाद काय म्हणाले? आता मी काय बोलू? तुम्ही विचारलं पाहिजे किती मज्जा आली. तितक्यात एका पत्रकाराने वेगळा प्रश्न विचारला, यावर इशान म्हणाला हे बघा हा असा प्रश्न विचारा. तुम्ही फार खराब प्रश्न विचारलात.” इशानने वैतागत या मुद्द्यावर बोलणं टाळलं आणि संघाच्या ऐतिहासिक विजयावर लक्ष केंद्रित केले.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात इशान किशनने दमदार कामगिरी केली. तो नऊ सामन्यांमध्ये ३५.२२ च्या सरासरीने ३१७ धावा करत भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सूर्याने स्पर्धेत तीन अर्धशतकं झळकावली.