आयपीएल हंगामाच्या पार्श्वभूमीवर संघाचा सराव सुरू झाला आहे. अशाच एक सराव सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूने कर्णधार इशान किशनशी पंगा घेतला आहे.

उत्तम फॉर्मात असलेल्या इशानने अन्सारीच्या ४ चेंडूत २० धावा चोपून काढल्या. पाचव्या चेंडूवरही इशानने मोठा फटका खेळला. मात्र या खेपेस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. विकेटनंतर अन्सारीने कर्णधार इशानला उद्देशून शेरेबाजी केली आणि त्याला ड्रेसिंगरुमच्या दिशेने जाण्याचा इशाराही केला. इशानने हसत गंमतीत हा प्रकार सोडून दिला. आपल्याच संघातील गोलंदाजाच्या या वागण्याने इशानही चकित झाल्याचं दिसून आलं.

सनरायझर्स हैदराबाद संघव्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वीच इशानची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीतून अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. कमिन्स हंगामातील सुरुवातीचे काही सामने तरी खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर इशानची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच आटोपलेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत इशानने जवळपास दोनशेच्या स्ट्राईकरेटसह ३१७ धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत इशान चौथ्या स्थानी होता. फायनलमध्ये त्याने संजू सॅमसनसह केलेली भागीदारी निर्णायक ठरली होती. इशानच्या नेतृत्वातच झारखंड संघाने देशातल्या सगळ्यात मोठ्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं.

आयसीसीच्या फलंदाजीच्या टी२० क्रमवारीत इशानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

पॅट कमिन्ससह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॅक एडवर्ड्सही दुखापतग्रस्त आहे. तो संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाहीये.