Ishan Kishan Reveals Suryakumar yadav phone call: भारताच्या ऐतिहासिक टी-२० विश्वचषक विजयात इशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. सलामीवीर अभिषेक शर्मा फॉर्मशी झगडत असताना त्याने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे सातत्याने प्रत्येक सामन्यात धावा केल्या. पॉकेट डायनामाईट अशी ओळख निर्माण केलेल्या इशानने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आक्रमक खेळ दाखवला आणि नऊ सामन्यांत ३१७ धावा केल्या. वर्षभर भारताच्या टी-२० संघाचा भागही नसलेल्या इशान किशनची थेट टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघात निवड झाली. या निवडीनंतर सूर्याने इशानला काय विचारलं होतं, याचा खुलासा त्याने केला.

इशान किशन या विश्वचषकातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर संजू सॅमसननंतर भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. संजू सॅमसनने या स्पर्धेत ३२१ धावा केल्या आहेत आणि त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला.

इशानने नामिबियाविरूद्ध सामन्यात ६१ धावांची खेळी केली. तर पाकिस्तानविरूद्ध ४१ चेंडूत ७७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. इशानच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने १७५ धावसंख्या उभारली आणि नंतर ६१ धावांनी विजय मिळवला. याशिवाय अंतिम सामन्यात संजू व अभिषेकने कमाल सुरूवात करून दिल्यानंतर त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी करत धावांचा वेग कायम ठेवला आणि शानदार अर्धशतकी खेळी साकारली.

भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर विश्वासार्ह फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करत इशानने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. फलंदाजीशिवाय त्याने क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणाच्या जबाबदाऱ्याही उत्कृष्ट रितीने पार पाडल्या. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा क्रिकेटपटू चपळ क्षेत्ररक्षणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याने अंतिम सामन्यात ३ महत्त्वपूर्ण झेल टिपले. मात्र विश्वचषकापूर्वी किशनसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. भारताचा कर्णधार सूर्यकुमारने त्याला थेट प्रश्न विचारला होता की तो भारताला विश्वचषक जिंकून देऊ शकतो का, पत्रकार परिषदेत इशानने याचा खुलासा केला.

सूर्यकुमार यादवच्या प्रश्नावर इशान किशनने केला प्रतिप्रश्न

“जेव्हा माझी टी-२० विश्वचषकासाठी निवड झाली, तेव्हा सूर्या भाऊने (सूर्यकुमार यादव) मला फोन केला. बहुधा तो संघाच्या मीटिंगदरम्यानच आला होता. मला वाटलं की हा कॉल टीमबद्दलच असेल, म्हणून मी त्याचा स्क्रीनशॉटही घेतला. मग त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला, ‘वर्ल्ड कप जिंकून देशील का?’ त्यावर मी त्याला विचारलं, ‘तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार का?’ त्यावर कॅप्टन म्हणाला, ‘चल, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो,” असं किशनने अंतिम सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

“तेव्हापासून मीही विश्वचषकाबद्दल विचार करू लागलो होतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मी चांगली कामगिरी केली होती, पण विश्वचषक म्हणजे मोठा स्टेज असतो. मात्र काम सोपं होतं, जे करायचं ते आत्मविश्वासाने करा आणि चेंडू मारायचा विचार आला की निर्धास्तपणे फटकेबाजी तरा. पण त्याचवेळी योग्य फटक्यांची निवड महत्त्वाची असते. खेळ जितका साधा ठेवतो, तितकं खेळाडूसाठी चांगलं ठरतं,” असं इशान किशन सामन्यानंतर म्हणाला.

भारतीय संघाने न्यूझीलंडचा फायनलमध्ये ९६ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने ५ बाद २५५ धावा करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. तसेच ९६ धावांचा हा विजय टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील धावांच्या फरकाने मिळालेला सर्वात मोठा विजय ठरला.