Ishan Kishan- Sanju Samson Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. पण भारतीय फलंदाजांनी या संधीचं सोनं केलं आणि इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. यादरम्यान संजू सॅमसन आणि इशान किशनच्या जोडीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. अभिषेक शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या ९ धावा करून झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून तुफान फटकेबाजी केली. नॉकआऊट सामन्यात दोघांनी मिळून दमदार अर्धशतकी भागीदारी केली. यासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. संजू सॅमसन आणि इशान किशनने मिळून ४५ चेंडूत ९७ धावांची भागीदारी केली. यासह युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पाच्या जोडीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंग या जोडीने २००७ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात ६.३ षटकात ८४ धावांची भागीदारी केली होती. इशान किशन आणि संजू सॅमसनने केलेली भागीदारी ही आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊट सामन्यांमध्ये कुठल्याही भारतीय जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.
संजू सॅमसनचं दमदार अर्धशतक
संजू सॅमसनला या स्पर्धेत केवळ ४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. सुरूवातीच्या २ सामन्यांमध्ये तो आपली छाप सोडू शकला नव्हता. पण गेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची निर्णायक खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. आता सेमी फायनलमध्येही भारतीय संघाला गरज असताना त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने ८९ धावा केल्या. तो आरामात शतक पूर्ण करू शकला असता. पण त्याने संघासाठी मोठे फटके खेळणं सुरू ठेवलं. या प्रयत्नात तो ८९ धावांवर माघारी परतला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ३९, सूर्यकुमार यादवने ११, हार्दिक पांड्याने २७ आणि तिलक वर्माने २१ धावांची खेळी केली.
