Ishan Kishan Reveals Sister Death: भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभूत करत विक्रमी ३ टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. सर्व भारतीय खेळाडूंचे कुटुंबिय हा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले होते. पण इशान किशनचे कुटुंबिय मात्र विजयानंतर सेलिब्रेट करताना दिसले नाहीत. इशान किशनने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. पण सामन्याच्या आदल्या इशान किशन व कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला होता.
इशान किशनचे वडील मुलाला अंतिम सामन्यात खेळताना पाहण्यासाठी एअरपोर्टकरता रवाना होत होते. ईशानचे वडील प्रणव पांडे अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जात होते. ईशानला फायनल खेळताना स्टेडियममध्ये पाहण्याची इच्छा होती, म्हणून ते शनिवारी अहमदाबादला रवाना होत होते, पण विमानतळावर पोहोचताच त्यांना धक्कादायक बातमी मिळाली. अंतिम सामन्याच्या बरोबर एक दिवस आधी इशान किशनची बहिण व तिच्या नवऱ्याचं एका रस्ते अपघातात आकस्मिक निधन झालं.
ईशानच्या वडिलांनी अहमदाबादला जाण्याचा त्यांचा प्लॅन रद्द केला आणि सिलिगुडीला रवाना झाले, जिथे ही दुर्घटना घडली. ईशानची बहीण आणि तिचा पती एका लग्नासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. पण, त्यांची दोन लहान मुलं या अपघातातून सुखरूप बचावली, असं रिपोर्टमध्ये समोर आलं. जेव्हा ईशानला त्याच्या वडिलांकडून ही बातमी कळताच धक्का बसला. त्याला बहिणीची अखेरची भेट घ्यायची होती, पण अंतिम सामन्यामुळे ते शक्य झालं नाही.
इशान किशनने बहिणीला समर्पित केला वर्ल्डकप ट्रॉफी विजय
इशान किशन भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर सामन्यापूर्वी काल माझ्या चुलत बहिणीचा कार अपघातात मृत्यू झाला. मी तिच्यासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. मी हार्दिक पंड्याशी बोललो होतो, त्याने संघाला सर्वात आधी प्राधान्य दे असं सांगितलं. हा विजय मी माझ्या बहिणीला समर्पित करतो. आज महिला दिनही आहे, त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी आणखी खास बनला आहे,” असं किशन म्हणाला.
इशानने कारकिर्दीतील देशासाठी पहिला अंतिम सामना खेळताना फक्त २५ चेंडूत जलद ५४ धावा केल्या, ज्यामुळे संघाला २५५ धावांचा मोठा टप्पा गाठता आला. त्याने केवळ फलंदाजीतच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर क्षेत्ररक्षणातही आपली हुशारी दाखवली आणि तीन शानदार झेल घेतले, ज्यामुळे संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
