Ishan Kishan Statement, KKR vs SRH: कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १६१ धावांवर आटोपला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने ६५ धावांनी आपल्या नावावर केला. हा सामना जिंकूनही इशान किशनने नाराजी व्यक्त केली आहे.

पॅट कमिन्स हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार आहे. पण त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसरा सामना जिंकून हैदराबादने गुणतालिकेत खातं उघडलं आहे. या सामन्यात तो १४ धावा करून माघारी परतला. इशान किशन फलंदाजीत योगदान देऊ न शकला नाही, त्यामुळे सामना जिंकूनही तो नाराज होता.

सामना झाल्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मी माझ्या फलंदाजीवर नाराज आहे. पण संघाने केलेल्या कामगिरीवर मी प्रचंड खुश आहे. मला जी अपेक्षा होती, सर्व खेळाडूंनी तशीच कामगिरी केली. खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण होतं, असं असतानाही हेड आणि अभिषेकने दमदार फलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केल्याने , इतर फलंदाजांना सेट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.”

तसेच गोलंदाजांचं कौतुक करताना इशान किशन म्हणाला, “हा सांघिक प्रयत्न होता. फिन अॅलन किती धोकादायक आहे, हे सर्वांनाच माहीत होतं. पण हर्षने उत्कृष्ट चेंडू टाकला आणि त्याला बाद केलं. हर्षने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. दबावाच्या परिस्थितीतही तो शांत राहतो. तसेच मला शिवांग कुमारबद्दलही बोलायला आवडेल, मैदान लहान असूनही त्याने चांगली गोलंदाजी केली.”

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. हैदराबादने २० षटकांअखेर ६ गडी बाद २२६ धावा केल्या. यादरम्यान हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ४८ धावा केल्या. २२७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ५२ धावा केल्या. पण कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १६१ धावांवर आटोपला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने ६५ धावांनी आपल्या नावावर केला.