Ishan Kishan On Duleep Trophy Win: इशान किशनच्या नेतृत्वात खेळताना ईस्ट झोन संघाने इतिहास घडवला आहे. दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात ईस्ट झोन संघाने अंतिम सामन्यात साऊथ झोन संघाला पराभूत करुन जेतेपदाचा मान पटकावला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना साऊथ झोनला ३५० धावा देखील करता आल्या नव्हत्या. पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतल्यानंतर ईस्ट झोन संघाचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही ईस्ट झोन संघाने ३५० हून अधिक धावा केल्या. त्यामुळे सामना ड्रॉ झाला आणि ईस्ट झोन संघाने १३ वर्षांनंतर विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर इशान किशन काय म्हणाला? जाणून घ्या.
इशान किशनने या सामन्यात एकट्याने ३५० धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना २७० आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ८० धावा केल्या. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून नोंद करण्यात आली. या सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, “आम्ही सर्वांनी मिळून हे जेतेपेद जिंकलं आहे. मला हेच वाटतं की, सर्वांनी मिळून एकमेकांना मदत केली आणि हेच महत्वाचं होतं. मला वाटतं मी एक चांगला लीडर आहे (हसत म्हणाला..) पण प्रवास इथेच थांबणार नाही. सर्वच डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत राहावं लागेल. क्षेत्ररक्षण करत असलो तरी, काही चुका होत असतात. त्यामुळे या चुका सावरून आणखी चांगली कामगिरी करत राहणं गरजेचं आहे.”
तसेच संघाबद्दल बोलताना म्हणाला, “मी सर्वांना मदत करत होतो आणि त्याचा माझ्यावरही चांगला परिणाम झाला आहे. मी आणखी शांत झालो आहे आणि परिस्थितीबद्दल अधिक जागरूक झालो आहे. माझी खेळण्याची भूक आणखी वाढली आहे. मला माझ्या संघासाठी आणखी चांगली कामगिरी करायची आहे. तुम्हाला संघासाठी जितकं चांगलं करता येईल, तितकं चांगलं करायचं असतं. याच गोष्टीने माझ्यात बदल घडवून आणला आहे. पुढचं वर्ष सुरू होईपर्यंत मी असाच राहणार आहे.”
या सामन्यात ईस्ट झोन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. यादरम्यान इशान किशनने २७० धावांची वादळी खेळी केली. तसेच कुमार कुशाग्रने १०१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाचा डाव ३३६ धावांवर आटोपला. यासह ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाकडून कुरैशीने ११६ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ८० धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने ३८८ धावांवर डाव घोषित केला. हा सामना ड्रॉ झाल्याने, पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ईस्ट झोन संघाने हा सामना जिंकून दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला.
