Ishan Kishan on Team India Snub: ईशान किशनने गुरुवारी झारखंडला इतिहासातील पहिलं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या टी-२० स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. हरियाणाविरुद्धच्या अंतिम सामन्यात, कर्णधार इशानने ४५ चेंडूत १० षटकार आणि सहा चौकारांसह जलद शतक झळकावलं. फायनलसह संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपताना दिसली. संघाला जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने भारतीय संघातून वगळल्याबाबत वक्तव्य केलं आहे.
भारताच्या सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून झारखंडकडून खेळताना, इशानने १० सामन्यांमध्ये ५७.४४ च्या सरासरीने ५१७ धावा केल्या. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. या डावखुऱ्या फलंदाजाने स्पर्धेत दोन शतकं, दोन अर्धशतकं झळकावली आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इशानने स्पर्धेत ५१ चौकार आणि ३३ षटकार मारले.
तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली अनुशासनहीनतेच्या मुद्द्यांमुळे २०२३ पासून ईशान किशनला भारतीय संघातून वगळण्यात आले. याबाबत बोलताना ईशान म्हणाला, “भारतीय संघात जेव्हा निवड झाली नाही, ते पाहून मला खूप वाईट वाटलं, कारण तेव्हा मी चांगली कामगिरी करत होतो. पण मी स्वतःला सांगितलं की जर अशा चांगल्या कामगिरीनंतरही माझी निवड झाली नाही, तर कदाचित मला अधिक मेहनत करावी लागेल. कदाचित मला माझ्या संघाला जिंकण्यास मदत करावी लागेल. कदाचित आपल्याला एक संघ म्हणून चांगलं प्रदर्शन करावं लागेल.”
आपल्या जबरदस्त फॉर्मात असूनही ईशान किशनची टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता फार कमी आहे. याबाबतही बोलताना तो म्हणाला, “मला माहितीये की बऱ्याचदा आपण संधी मिळावी अशी अपेक्षा करतो आणि जेव्हा संघामध्ये तुमचं नाव दिसत नाही, ते पाहून खूप वाईट वाटतं. म्हणून मी आता कशाची अपेक्षाच ठेवलेली नाही,” असं तो हसत हसत म्हणाला. “पण माझं काम फक्त सातत्याने कामगिरी करत राहणं हे आहे.’
झारखंडचा कर्णधार इशानने अंतिम सामन्यात संस्मरणीय खेळी केली. त्याच्या खेळीमुळे झारखंडने हरियाणाविरुद्ध ३ बाद २६२ धावांचा मोठा डोंगर उभारला आणि नंतर संघाने ६९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
