Ishan Kishan Stunning Catch Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी टी-२० विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. संजू सॅमसन, इशान किशन व अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने ५ बाद २५५ धावा केल्या. तर रनचेसमध्ये इशान किशनने एक अफलातून झेल टिपला.

भारताकडून अभिषेक शर्मा व संजू सॅमसनच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. भारताच्या तिन्ही सुरूवातीच्या फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत विक्रम रचला. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा करत बाद झाला. तर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. पुन्हा एकदा त्याचं शतक हुकलं. तर इशानने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शिवाय शिवम दुबेने अखेरच्या षटकांमधअये ८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांची खेळी केली. यासह भारताने २५५ धावांचा डोंगर उभारला.

इशान किशनचा कॅच ऑफ द मॅच पाहिलात का?

न्यूझीलंड संघ २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला. या डावातील चौथं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहला पाचारण केलं. बुमराहच्या चेंडूवर रचिन पिक अप फ्लिक खेळायला गेला आणि चेंडू बॅटच्या चेंडूची कड घेत हवेत उंच उडाला. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. जिथे इशान किशन तैनात होता. इशान चेंडू पाहून पुढच्या दिशेला धावत आला.

इशानने चेंडू टाईम करत पुढच्या दिशेने डाईव्ह केली आणि चेंडू टिपला. चेंडू टिपताच तो पुढे पडला. मैदानावर हात आपटल्यानंतर चेंडू हातातून सुटला, पण त्याने चेंडू सावरला आणि उत्कृष्ट झेल टिपला. रचिन रवींद्र त्याच्या सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर इशान व बुमराहने कमालीचं सेलिब्रेशन केलं. बुमराहने इशानला उचलून घेत दणक्यात सेलिब्रेशन केलं. इशानच्या या कॅचचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

वरूण चक्रवर्तीच्या नवव्या षटकात टीम सेफर्ट मोठा फटका खेळायला आणि तेव्हाही इशानने अजून एक कमालीचा झेल टिपला. इशानने सीमारेषेजवळ हा झेल टिपला, पण त्याचा तोल जाणार असं जाणवताच त्याने चेंडू सोडला आणि पुन्हा पुढे येत चेंडू टिपला. त्याच्या त्या कमालीच्या कॅचमुळे सेफर्टची महत्त्वाची विकेट संघाला मिळाली. सेफर्ट २६ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावा करत बाद झाला.