Ishan Kishan Catch Video: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इशान किशनने असा काही झेल घेतला, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इशान किशन सर्वौत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. त्याने यष्टीच्या मागे एकापेक्षा एक भन्नाट झेल घेतले आहेत. पण पहिल्या टी-२० सामन्यात त्याने बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करताना अविश्वसनीय झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इशान किशन आपल्या यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. पण संजू सॅमसन संघाचा भाग असल्याने त्याला यष्टीरक्षण करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे इशान किशन बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करतान दिसून आला. तर झाले असे की, कुलदीप यादव गोलंदाजी करण्यासाठी आला. कुलदीप यादवने फलंदाजी करत असलेल्या फोर्डला शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर फोर्डने मोठा फटका मारला. चेंडू वेगाने बाऊंड्री लाईनच्या दिशेने गेला. आधी तो झेल घेण्याच्या पोझिशनमध्ये होता. पण शेवटी फ्लड लाईट्समुळे चेंडू दिसेनासा झाला. तरीदेखील त्याने चेंडूचा अचूक अंदाज घेतला. त्याने न पाहताच भन्नाट झेल घेतला.

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात भारतीय संघ १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता, हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने पहिल्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. अभिषेक शर्मा २१ , तर संजू सॅमसन ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशनच्या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या शे होपने ५२ धावांच खेळी केली. तर कमिल पूरन १२ धावांवर माघारी परतला. शिमरन हेटमायर ५, रोमन पॉवेल शून्यावर माघारी परतला. शेवटी शेरफेने रूदरफोर्डने तुफान फटकेबाजी केली. त्याने ५६ धावा कुटल्या. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १७१ धावा केल्या.