Ishan Kishan Trolled CSK Fans Video: चेन्नईत खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नईचा पराभव केला. या विजयाचा हिरो इशान किशन ठरला. इशानने ७० धावांची मॅचविनिंग खेळी करत हैदराबादला जिंकून देत प्लेऑफसाठी क्वालिफाय करून देण्यात मोठी भूमिका बजावली. मात्र, विजयानंतर इशान किशनने जे काही केलं, त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने संपूर्ण चेन्नईच्या चाहत्यांसमोर उद्धटपणे वर्तन केलं. ज्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.
इशान किशन मॅचविनिंग खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत बाद झाला. इशानने ४७ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. इशान बाद झाल्यानंतर सलिल अरोरा व रविचंद्रन स्मरण यांनी संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईने दिलेल्या १८१ धावांचं लक्ष्य हैदराबादने अवघ्या १९ षटकांत गाठलं आणि ५ विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर चेपॉक स्टेडियममधील इशान किशनची प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद झाली. सीएसकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यानंतर, इशान स्टेडियममध्ये बसलेल्या सीएसकेच्या चाहत्यांना हातवारे करत शिट्टी वाजवताना दिसला. इशान हे करत असताना, धोनी एसआरएचच्या इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलन करत होता.
चेन्नई सुपर किंग्सचे चाहते आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिट्टी वाजवतात. याला ‘व्हिसल पोडू’ असंही म्हणतात. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यानही सीएसकेचे चाहचे शिट्टी वाजवत संघाला पाठिंबा देत होते. मात्र, चेन्नईे सामना गमावल्यानंतर इशान किशनने शिट्टी वाजवली आणि यानंतर त्याने हातवारे करत चाहत्यांना स्टेडियमबाहेर निघून जा म्हणताना दिसला. इशान किशनने केलेल्या या कृतीमुळे चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या विजयात इशान किशनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्याने ४७ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. सात चौकार आणि तीन षटकारांसह, या हंगामातील हे त्याचे पाचवे अर्धशतक होतं. इशान किशन सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावुक झाला होता. टी-२० विश्वचषकादरम्यान त्याच्या चुलत बहिणीचं अपघाती निधन झालं. तिचे सर्व कुटुंबीय त्याचा भाऊ हा सामना पाहण्यासाठी आले होते. इशान किशन सामन्यानंतर याबाबत बोलताना भावुक झाला होता. इशान किशनला हा सामना त्याच्या भावासाठी जिंकायचा होता, असंही तो अखेरीस म्हणाला.
