Ishan Kishan- Vaibhav Sooryavanshi Dance Video: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ईस्ट झोन संघाकडून एकतर्फी खेळ पाहायला मिळाला. ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात घेतलेल्या भक्कम आघाडीच्या बळावर १३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचा मान पटकावला. इशान किशनने कर्णधार आणि फलंदाज म्हणून संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. दरम्यान ऐतिहासिक विजयानंतर इशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि ईस्ट झोन संघातील खेळाडू भन्नाट डान्स करताना दिसून आले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या स्पर्धेसाठी इशान किशनची कर्णधार आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली होती. इशान किशनच्या अनुपस्थितीत वैभव सू्र्यवंशी संघाचं नेतृत्व करताना दिसून आला. इशान आणि वैभव दोघांनीही फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. अंतिम सामन्यातील पहिल्या डावात वैभव अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता, पण त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. तर दुसरीकडे इशान किशनने पहिल्या डावात २७० आणि दुसऱ्या डावात ८० धावा करून या सामन्यात विक्रमी ३५० धावा केल्या. यासह ईस्ट झोन संघाच्या विजयाचा हिरो ठरला.

ईस्ट झोन संघातील खेळाडूंचा भन्नाट डान्स

हा विजय ईस्ट झोन संघासाठी अतिशय खास आहे. कारण १३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ईस्ट झोन संघाने जेतेपदाचा मान पटकावला आहे. त्यामुळे विजयाचा जल्लोष होणं साहजिक होतं. कर्णधार इशान किशन आणि वैभव सूर्यवंशीसह ईस्ट झोन संघातील सर्व खेळाडू भन्नाट डान्स करताना दिसून आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वैभव सूर्यवंशी हातात स्टम्प घेऊन डान्स करताना दिसून येत आहे. तसेच इशान किशन देखील त्याला साथ देऊन भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ईस्ट झोनचा एकतर्फी विजय

या सामन्यात ईस्ट झोन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. यादरम्यान इशान किशनने २७० धावांची वादळी खेळी केली. तसेच कुमार कुशाग्रने १०१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाचा डाव ३३६ धावांवर आटोपला. यासह ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाकडून कुरैशीने ११६ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ८० धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने ३८८ धावांवर डाव घोषित केला. हा सामना ड्रॉ झाल्याने, पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ईस्ट झोन संघाने हा सामना जिंकून दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला.