‘इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांसमोर असा पराभव होणं लाजिरवाणं आहे. आम्ही चांगली सुरुवात केली. पण मिचेल सँटनर आणि कोल मॅकहोनी यांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. आमच्यापासून विजय तिथे दुरावला’, अशा शब्दांत श्रीलंकेचा कर्णधार दासून शनकाने पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सुपर८ गटाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेने न्यूझीलंडची अवस्था ८४/६ अशी केली होती. मात्र यानंतर मिचेल सँटनर आणि कोली मॅकहोनी यांनी सातव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर न्यूझीलंडने १६८ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्याच चेंडूवर भरवशाचा पाथुम निसांका त्रिफळाचीत झाला. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी आशाच सोडली. न्यूझीलंडच्या फिरकीसमोर श्रीलंकेने सपशेल शरणागती पत्करली. श्रीलंकेने १०७ धावा केल्या.

टॉस जिंकून गोलंदाजी करण्याच्या निर्णयाबाबत शनका म्हणाला, ‘टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय सगळ्यांनी चर्चा करून घेतला होता. खेळपट्टी फिरकीला एवढी साथ देईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. कारण ही नवी खेळपट्टी आहे. न्यूझीलंडला १३० पर्यंत रोखायचं होतं. पण त्यांनी धावसंख्या दीडशेपल्याड नेली. ते चांगलं खेळलं’.

‘कुशल परेराला दुखापतीचा त्रास होता. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये त्याला न खेळवण्याचा विचार करू शकत नव्हतो. कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. नवी खेळपट्टी असल्याने फलंदाजी करणं सोपं होईल असा अंदाज होता पण तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला’.

‘शेवटच्या सामन्यात चांगला खेळ करायचा आहे. फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे. एखाद्या फलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. बाद झालात तरी हरकत नाही पण सकारात्मक पवित्रा असणं आवश्यक आहे. आघाडीच्या फलंदाजांपैकी कोणीच जबाबदारी स्वीकारली नाही. आम्ही चांगल्या भागीदाऱ्या करू शकलो नाही’, असं शनकाने सांगितलं.