करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपक्षा जास्त काळ सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र डिसेंबर महिन्यात भारतीय संघाचा प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यासाठी भारतीय संघानेही वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात खेळण्याची तयारी दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयन चॅपल यांनी या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघात स्थान मिळावं असं मत व्यक्त केलं आहे.

“हार्दिक पांड्या या कसोटी मालिकेसाठी खेळणार असेल तर ते भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. हार्दिकच्या संघात असण्यामुळे भारताला गोलंदाजीसाठी एक पर्याय तयार होतो आणि दबावाच्या परिस्थितीत प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यासाठीही हार्दिकचा चांगला वापर होऊ शकतो. हार्दिकसाठी ही चांगली संधी ठरु शकते.” चॅपल यांनी ESPNCricinfo संकेतस्थळासाठी लिहीलेल्या लेखात आपलं मत मांडलं आहे.

अवश्य वाचा – घरी बसून झोंबी झाल्यासारखं वाटतंय, लवकर सरावाला सुरुवात करायला हवी – दिनेश कार्तिक

२०१८ साली आशिया चषकात खेळत असताना हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं होतं. सध्या लॉकडाउन काळात क्रिकेट बंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्या दुखापतीमुळे सतत संघाबाहेर होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केलं आहे.