युव्हेंटस अंतिम फेरीत

युव्हेंटसने सात वर्षांत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

(संग्रहित छायाचित्र)

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा

युव्हेंटसने इंटर मिलानविरुद्ध परतीच्या लढतीत गोलशून्य बरोबरी पत्करली तरी २-१ अशा गोलफरकाच्या जोरावर त्यांनी इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली. युव्हेंटसने सात वर्षांत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

अ‍ॅटलांटा आणि नापोली यांच्यात बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. अंतिम लढत १९ मे रोजी रंगणार आहे. ‘‘सुपर चषकाचे जेतेपद तसेच इटालियन चषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले असले तरी आम्हाला अद्याप बरीच मजल मारायची आहे. आम्ही चांगला खेळ केला तरी गोल करण्यात आम्ही अपयशी ठरलो,’’ असे युव्हेंटसचे प्रशिक्षक आंद्रिया पिलरे यांनी सांगितले. इंटर मिलानला सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

युनायटेड, बॉर्नेमाऊथ उपांत्यपूर्व फेरीत

मँचेस्टर : मँचेस्टर युनायटेडने सलग सातव्या वर्षी एफए चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बॉर्नेमाऊथने १२२ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा बाद फेरीत प्रवेश केला. स्कॉट मॅकटोमिनाय याने ९७व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने वेस्टहॅमचा पाचव्या फेरीत १-० असा पराभव केला. बॉर्नेमाऊथने बर्नलेचे आव्हान २-० असे परतवून लावले. सॅम सरिज आणि ज्युनियर स्टॅनिस्लास यांचे गोल त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.

========================

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Italian cup football tournament juventus in the final abn