मुंबई : क्रीडाविश्वात इटली हा शब्द उच्चारल्यास डोळ्यासमोर चार वेळचा विश्वविजेता फुटबॉल संघ उभा राहतो. मात्र, गेल्या काही महिन्यांत इटालियन फुटबॉल संघापेक्षा तेथील क्रिकेट संघाची चर्चा अधिक रंगते आहे. याला कारणही तसेच आहे.
इटलीच्या संघाने यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरत इतिहास घडवला. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट विश्वचषकात खेळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ! गेल्या काही वर्षांत इटालियन क्रिकेटमध्ये मोठे बदल घडले आहेत. विविध देश, संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेले खेळाडू इटलीच्या क्रिकेटला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी आपले ध्येय साध्यही करून दाखवले आहे.
इटालियन क्रिकेट संघ हा विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंचे पूर्वज दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतरच्या दशकांत इटलीतून स्थलांतरित झाले होते. मनेन्टी बंधू (बेन आणि हॅरी), मोस्का बंधू (अँथनी आणि जस्टीन) यांची हीच पार्श्वभूमी. दक्षिण आफ्रिकेतील जेजे स्मट्स आणि वेन मॅडसन यांच्यासारखे खेळाडू, तसेच इंग्लंडमधील काही खेळाडूंची मुळेही इटलीत रुजलेली आहेत. विशेष म्हणजे मॅडसन यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून हॉकी खेळला आहे. मात्र, आता क्रिकेटमध्ये इटलीचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटत असल्याचे तो आवर्जून सांगतो. त्याला इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट खेळण्याचाही प्रदीर्घ अनुभव आहे. झैन अलीचे वडील डॉक्टर असून ते पाकिस्तानातून इटलीत आले. जसप्रीत सिंग पंजाबहून, तर क्रिशन कालुगमगे श्रीलंकेतून इटलीत स्थायिक झाला. या खेळाडूंनी इटलीला आणि तेथील क्रिकेटला आपलेसे केले आहे.
पात्रता फेरीतील चमकदार कामगिरीनंतर मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला जो बर्न्स संघापासून दूर झाला. मात्र, त्यानंतरही इटलीच्या संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात छाप पाडली आहे. बर्न्स आणि कर्णधार मॅडसन या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही इटलीने गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेपाळला पराभूत करून इतिहास घडवला आणि उज्ज्वल भविष्याचे संकेत दिले आहेत.
थोडक्यात ओळख…
– इटलीचा संघ प्रथमच विश्वचषकात खेळत असला, तरी या देशात क्रिकेटचा मोठा इतिहास असल्याचे म्हटले जाते. १७९३ मध्ये इंग्लंडचे नौदलप्रमुख नेल्सन यांनी इटलीत नोंदवला गेलेला पहिला सामना आयोजित केला होता.
– यानंतर इंग्लंडमध्ये जन्मलेले पण इटलीत कार्यरत असलेले कर्नल फ्रान्सिस मॅसेरोनी यांनी १८१०च्या दशकात हा खेळ नेपल्समध्ये आणला.
– १८९३मध्ये जेनोआ क्रिकेट अँड ॲथलेटिक क्लबची स्थापना झाली. उन्हाळ्यात क्रिकेट आणि हिवाळ्यात फुटबॉल खेळण्याचा त्यांचा उद्देश होता. हा क्लब पुढे देशातील सर्वांत जुना फुटबॉल क्लब ठरला.
– सध्या इटलीत १८०० नोंदणीकृत खेळाडू आणि अंदाजे १०० क्लब आहेत, असे इटालियन क्रिकेटशी निगडित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. इटलीला १९९५ साली ‘आयसीसी’चे सहयोगी सदस्य म्हणून मान्यता मिळाली होती.

