Italy Mosco Brothers World Record in T20 WC: वानखेडे स्टेडियमवर गुरूवारी १२ फेब्रुवारीला ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक खेळत असलेल्या इटली व नेपाळ यांच्यात टी-२० विश्वचषक सामना खेळवला गेला. या सामन्यात इटली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. जस्टिन मॉस्को आणि अँथनी मॉस्को या दोन भावंडांनी इटली संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. या कामगिरीसह मॉस्को बंधूंनी विश्वविक्रम केला आहे.

दोन सख्ख्या भावांनी इटलीला मिळवून दिला विजय

मॉस्को भावांनी अवघ्या ७४ चेंडूंमध्ये नाबाद १२४ धावांची भागीदारी करत इटलीला टी-२० विश्वचषकातील पहिला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यासह इटलीने १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि तब्बल ४६ चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. पहिल्या सामन्यात ७३ धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर, नियमित कर्णधार वेन मॅडसन दुखापतीमुळे बाहेर पडला असतानाही इटालियन संघाने शानदार कामगिरी केली.

वानखेडेच्या मैदानावर इटलीच्या फिरकी गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पडले आणि अवघ्या १२३ धावांवर रोखलं. त्यानंतर मॉस्को बंधूंनी सलामीला उतरत एकहाती सामना संपवला आणि इतर कोणत्या फलंदाजांना मैदानावर येण्याची गरजच लागली नाही. जस्टिनने ४४ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तर मोठा भाऊ अँथनीने केवळ ३२ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ६२ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. मॉस्को बंधूंच्या या शानदार भागीदारीने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात नवा इतिहास घडवला.

विश्वचषकात दोन सख्ख्या भावांनी शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी स्पर्धेच्या इतिहासातील भावंडांची सर्वोच्च भागीदारी पाकिस्तानच्या अकमल बंधूंनी २०१४ मध्ये साकारली होती. मॉस्को बंधूंची १२४ धावांची ही भागीदारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही सख्ख्या भावंडांमधील सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वोच्च भागीदारी साकारणारी भावंडांची जोडी

जस्टिन मॉस्को आणि अँथनी मॉस्को (इटली)विरूद्ध पाकिस्तान – १२४ धावा, मुंबई २०२६

कामरान अकमल आणि उमर अकमल (पाकिस्तान) विरूद्ध ऑस्ट्रेलिया – ९६ धावा, मीरपूर २०१४

बेन मॅनेन्टी आणि हॅरी मॅनेन्टी (इटली) विरूद्ध स्कॉटलंड – ७३ धावा, कोलकाता, २०२६

नायल ओ’ब्रायन आणि केविन ओ’ब्रायन (आयर्लंड) विरूद्ध ऑस्ट्रेलिया – ५२ धावा, कोलंबो २०१२

टॉम कूपर आणि बेन कूपर (नेदरलँड्स) विरूद्ध झिम्बाब्वे – ५२ धावा, सिल्हेट २०१४

दरम्यान, टी-२० विश्वचषकात सहयोगी राष्ट्राच्या सलामीवीर जोडीने शतकी भागीदारी करण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे. तसंच, कसोटी क्रिकेट खेळत नसलेल्या राष्ट्राने या स्पर्धेत १० गडी राखून विजय मिळवण्याची ही फक्त दुसरी घटना ठरली. याआधी २०२१ मध्ये ओमानने पापुआ न्यू गिनी संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता.