बोलोन्या (इटली) : इटलीने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. या वेळी प्रमुख खेळाडू यानिक सिन्नेरच्या गैरहजेरीतही इटलीने स्पेनवर २-० अशी सहज मात केली.

माटेओ बेरेट्टिनी आणि फ्लावियो कोबोली यांनी आपल्या एकेरीच्या लढती जिंकून स्पेनविरुद्ध २-० अशी निर्णायक आघाडी घेत इटलीचे विजेतेपद निश्चित केले. स्पेनचा संघ २०१९ नंतर प्रथमच स्पर्धेची अंतिम लढत खेळत होता.

इटलीचे हे चौथे, तर सलग तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी १९६८ ते ७२ या कालावधीत सलग तीन विजेतेपद मिळविणारा अमेरिका एकमेव देश होता. अमेरिकेने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. इटलीने १९७६ मध्ये सर्व प्रथम ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर २०२३, २०२४ मध्येही त्यांनी विजेतेपद मिळवले होते. मात्र, मायदेशात डेव्हिस चषक जिंकण्याची ही त्यांची पहिलीच वेळ ठरली.

गेल्या दोन वर्षांत इटलीला पुरुषांच्या टेनिसमध्ये मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सिन्नेरने नव्या हंगामाच्या तयारीसाठी या वेळी डेव्हिस चषकातून माघार घेतली. लॉरेन्झो मुसेट्टीही खेळत नव्हता. यानंतरही इटलीने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रिया, उपांत्य फेरीत बेल्जियम आणि अंतिम फेरीत स्पेनवर मात केली.

अंतिम लढतीत बेरेट्टिनीने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा ६-३, ६-४ असा पराभव केला. त्यानंतर कोबोलीने पहिला सेट गमाविल्यावर दमदार पुनरागमन करताना ग्वामे मुनारचे आव्हान १-६, ७-६ (७-५), ७-५ असे परतवून लावले. कोबोलीने विजयी गुण घेतल्यावर आनंदाने उडी मारत आपली रॅकेट कोर्टवरच सोडून दिली आणि त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी कोबोलीला हवेत उंचावले.

भारताच्या लढतीसाठी दिल्ली, कर्नाटक उत्सुक

पुढील वर्षी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताची गाठ नेदरलँड्सशी पडणार आहे. फेब्रुवारीमध्ये होणारी ही लढत भारतात होणार असून, यजमानपदासाठी नवी दिल्ली आणि कर्नाटकने इच्छा व्यक्त केली आहे. ही लढत हार्ड कोर्टवर ६, ७ किंवा ७, ८ फेब्रुवारीस अपेक्षित आहे. यजमान देशाला यापैकी एक तारीख निवडण्याची मुभा आहे.