Jofra Archer On Vaibhav Sooryavanshi: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १२५ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघ २०२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ७६ धावांवर आटोपला. या मालिकेतील प्रमुख आकर्षण वैभव सूर्यवंशीला गेल्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली गेली होती. पदार्पणात २ षटकार मारुन तो माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने २ षटकार खेचले, पण तो मोठी खेळी करु शकला नाही. त्याला जोफ्रा आर्चरने बाद करत माघारी धाडलं. दरम्यान सामना झाल्यानंतर आर्चरने वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यासह त्याला वॉर्निंग देखील दिली आहे.

वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर हे दोघेही आयपीएल स्पर्धेत एकाच संघात खेळतात. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने अनेकदा नेट्समध्ये जोफ्रा आर्चरचा सामना केला आहे. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची मजबूत बाजू आणि कमकुवत बाजू माहीत आहे. वैभवने दुसऱ्या टी-२० सामन्यात आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. आता तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार खेचला. पण आर्चरने त्याला बाऊन्सर टाकून बाद केलं. त्यामुळे वैभवला अवघ्या १३ धावांवर माघारी परतावं लागलं.

जोफ्रा आर्चर काय म्हणाला?

तिसरा टी-२० सामना झाल्यानंतर जोफ्रा आर्चरला वैभव सूर्यवंशीला बाद करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “मला वाटतं आता हिशोब बरोबर झाला आहे. अजूनही २ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं. जो चांगला खेळ करणार, तो जिंकणार.” १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अनुभवी जोफ्रा आर्चरचा सामना करताना दुसऱ्या सामन्यात १ आणि तिसऱ्या १ सामन्यात १ षटकार खेचला होता. पण आर्चरने त्याला बाद करुन बदला घेतला आहे.” आता मालिकेतील चौथ्या सामन्यात संधी मिळाल्यास वैभव सूर्यवंशी आणखी मोठे फटके खेळणार, की जोफ्रा आर्चर त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. मालिकेतील तिसरा सामना ९ जुलैला खेळवला जाणार आहे. हा सामना ब्रिस्टलमध्ये खेळवला जाणार आहे. २-० ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ ही मालिका जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.