Ramiz Raja on Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी मिकी आर्थरच्या राष्ट्रीय संघातील संचालकपदी नियुक्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. याला त्यांनी ‘गावातील सर्कसचा जोकर’ असे संबोधले आहे. माजी कर्णधाराने माजी मुख्य प्रशिक्षकाच्या पाकिस्तान क्रिकेटवरील निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मिकी आर्थर यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती केल्याबद्दल पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष नजम सेठी यांच्यावर निशाणा साधला आहे. नजम सेठी यांना क्रिकेटचे ज्ञान नसल्याचा आरोप रमीझने केला आहे. त्यांनी अशा व्यक्तीची नियुक्ती केली आहे ज्याची निष्ठा पाकिस्तान क्रिकेटपेक्षा काउंटी संघाशी जास्त आहे. एक दिवस आधी पीसीबीने पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांची संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. मिकीने २०१६ ते २०१९ पर्यंत पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. नव्या भूमिकेत तो पूर्णवेळ संघासोबत राहणार नाही.
रमीझने मोठं वक्तव्य केलं आहे
माजी क्रिकेटपटू रमीझ राजा म्हणाले, “पाकिस्तान क्रिकेट दूरस्थपणे (ऑनलाइन) चालवण्यासाठी अशा प्रकारचा पहिला प्रशिक्षक निवडला गेला आहे ज्यांची निष्ठा पाकिस्तान क्रिकेटपेक्षा त्याच्या काऊंटी संघाप्रती अधिक आहे. तो वेड्या गावातल्या सर्कसच्या विदुषकासारखा आहे.”
क्रिकेट समितीनेही टीका केली
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) माजी अध्यक्षांनी विद्यमान प्रमुख नजम सेठी आणि त्यांच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीवरही जोरदार टीका केली. रमीझ म्हणाला, “पीसीबी अध्यक्षांना क्रिकेट समजत नाही. त्याला त्याच्या काळात खेळाडू म्हणून क्लब सामन्यांच्या संघात स्थान मिळू शकले नसते. पाकिस्तान क्रिकेट हे राजकारणी लोक चालवत आहेत आणि या कामासाठी त्यांना दरमहा १२ लाख रुपये पगारही मिळत आहे.”
‘१२ लाख पगार मिळत नाही’
बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र क्रिकेट व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना मासिक पगार मिळत असल्याचा रमीझचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, “हे पूर्णपणे चुकीचे असून सेवा नियमानुसार व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना बैठे सोयीसुविधा आणि दैनंदिन भत्ता मिळतो. पीसीबी शहराबाहेर राहणाऱ्या सदस्यांसाठी निवास व्यवस्था करते. रमीझने यापूर्वीही पीसीबीवर टीका केली होती, ज्यावर सेठी म्हणाले की ते मंडळाकडून मासिक पेन्शन घेत आहेत, त्यामुळे ते पीसीबीच्या आचारसंहितेच्या अंतर्गत त्याच्या धोरणांवर किंवा अधिकाऱ्यांवर टीका करू शकत नाहीत.”