Ivonne Vildosola Debut Under Granddaughter Camila Oyarse Captaincy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वयस्कर खेळाडूंना आपण खेळताना पाहिलं आहे. जवळपास चाळीशीच्या जवळ येताच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देतात, तर काही खेळाडू पन्नाशीतही खेळताना दिसतात, जे अपवाद आहेत. पण महिला क्रिकेटमध्ये आता वयाच्या ७०व्या वर्षी महिला क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रिकेटपटूने आपल्या नातीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसली. अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड महिला क्रिकेटमध्ये झाला आहे.

चिलीच्या इव्होन विल्डोसोला यांनी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून त्यांनी हा ऐतिहासिक क्षण साकारला. २०१९ मध्ये पहिल्यांदाच हातात बॅट घेतलेल्या विल्डोसोला यांनी या वर्षी एप्रिलमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून पदार्पण केलं. कॅमिला ओयार्सच्या नेतृत्वाखालील चिलीच्या महिला क्रिकेट संघाकडून आपला पहिला सामना खेळण्याची संधी या ७० वर्षीय खेळाडूला मिळाली.

इव्होन विल्डोसोला आणि कॅमिला ओयार्स या आजी-नात आहेत. थोडक्यात सांगायचं तर, ७० वर्षीय आजीने आपल्या नातीच्या नेतृत्वात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं. अशी अनोखी घटना क्रिकेटच्या मैदानावर सर्वांना पाहायला मिळाली आहे.

सात वर्षांपूर्वी, ‘लास लोइकास’ (Las Loicas) नावाच्या चिलीयन महिला संघाने न्युब्ले (Ñuble) येथे ‘माता आणि कन्या’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘क्रिकइन्फो’नुसार, त्यावेळी ओयार्सचे वय १६ वर्षे होते. तिने आपल्या आजीलाही आपल्यासह सहभागी होण्यासाठी राजी केलं. ओयार्सने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. २०१० मध्ये, तिची एक शिक्षिका अलेजांड्रा झुनिगा हिने चिलीसाठी दोन टी-२० सामने खेळले होते. विल्डोसोला यांची क्रिकेटमधील आवड हळूहळू वाढत गेली, परंतु त्यांची मुलगी लोरेटो आणि नात ओयार्स यांनीच त्यांना या खेळात सातत्य राखण्यासाठी प्रोत्साहन दिले.

जगातील सर्वात वयस्कर सक्रिय क्रिकेटपटू

व्हिल्डोसोला हिने एप्रिल २०२६ मध्ये कोस्टा रिकाविरुद्धच्या सामन्यातून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि ऑयार्ससह सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या कामगिरीसह, वयाच्या ७० व्या वर्षी ती जगातील सर्वात वयस्कर सक्रिय क्रिकेटपटू ठरली. व्यावसायिक क्रिकेट खेळणारी ती दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू बनली; तिच्या आधी राजा महाराज सिंग यांनी १९५०-५१ च्या हंगामात वयाच्या ७२ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

क्रिकेटमुळे विल्डोसोला यांना सक्रिय राहण्याची संधीही मिळाली. त्या कधीही व्यावसायिक पातळीवर खेळल्या नसल्या, तरी मनोरंजनासाठी त्या इतर खेळांमध्ये सहभागी होत असत. विल्डोसोला यांना फलंदाजी करायला आवडते आणि त्या मैदानावर सरळ रेषेत फटके (स्ट्रेट शॉट्स) मारणं पसंत करतात. वेळ मिळेल तेव्हा विल्डोसोला आणि ओयार्स एकत्र सराव करतात. स्पर्धांपूर्वी त्या एकमेकींना उपयुक्त सल्ले देतात; विशेष म्हणजे, वयाच्या ७० व्या वर्षीही त्यांच्या जोडीदाराचे वय त्यांच्यापेक्षा साधारण ५० वर्षांनी कमी असते.