Jacob Bethell Record: Jacob Bethell Record: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे कुठल्याही संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी गमावण्याची नव्हती. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. त्यामुळे निम्म्याहून अधिक क्रिकेट चाहत्यांना वाटलं असेल की, भारताने हा सामना जिंकला. पण इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलने इंग्लंडला जवळजवळ विजय मिळवून दिला होता. हा सामना इंग्लंडने अवघ्या ७ धावांनी गमावला. यासह जेकब बेथलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ३८ धावांवर दुसराफ धक्का बसला. त्यावेळी जेकब बेथेल फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. सेमी फायनलसारख्या सामन्यात २५४ धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसतं. त्यामुळे इंग्लंडचा संघ दबावात होता. एका बाजूने धावा होत होत्या, पण विकेट्सही जात होत्या. ९५ धावांवर संघातील ४ फलंदाज माघारी परतले होते. त्यावेळी जेकब बेथेलने विल जॅक्ससोबत मिळून ७८ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिलं.
जेकब बेथेलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद
जेकब बेथेल हा अवघ्या २२ वर्षांचा आहे. २५४ धावांचा पाठलाग करताना त्याने ८ चौकार आणि ७ षटकारांचा साहाय्याने ४८ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. मात्र शेवटच्या षटकात तो बाद होऊन माघारी परतला. यासह तो टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.
याआधी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज फिन ॲलेनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेकब बेथलने त्यात आणखी ५ धावांची भर घातली आणि सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. इतर कुठल्याही फलंदाजाला आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये इतकी मोठी खेळी करता आलेली नाही.
