९ चेंडूमध्ये ४ विकेट्स पटकावत अष्टपैलू जेकब बेथेलने इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध १२ धावांनी नाट्यमय विजय मिळवून दिला. १७व्या षटकाच्या अखेरीस श्रीलंकेला १८ चेंडूत २१ धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या हातात ६ विकेट्स होत्या. बेथेलने दुनिथ वेलागे, दुश्मंत चमीरा आणि दासून शनका यांना एकाच षटकात बाद करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं. २०व्या षटकात महेश तीक्षणाला माघारी धाडत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश साकारलं. श्रीलंकेचा टी२० प्रकारात इंग्लंडविरुद्धचा हा सलग ११वा पराभव आहे. दमदार कामगिरीसह इंग्लंडने वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं सिद्ध केलं आहे. घरच्या मैदानावर झालेला हा दारुण पराभव वर्ल्डकपचे यजमान श्रीलंकेच्या चिंतेत भर टाकणारा आहे.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली तेव्हा त्यांनाही धावांसाठी झगडावं लागलं. सॅम करनने ४८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची मोठी खेळी साकारली. सलामीवीर जोस बटलरने २५ धावा केल्या. बाकी फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. श्रीलंकेतर्फे दुश्मंत चमीराने २४ धावांत ५ विकेट्स पटकावल्या.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना पाथुम निसांका (२३), कुशल मेंडिस (२६) यांनी धावफलक हलता ठेवला. मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. मात्र तरीही लक्ष्य श्रीलंकेच्या आवाक्यात होतं. मात्र बेथेलच्या षटकात सगळं चित्र पालटलं.
पहिल्या चेंडूवर ४ बाईज मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर दुनिथ वेलागेने मोठा फटका खेळला. मात्र यष्टीरक्षक बटलरने लॉन्ग लेग क्षेत्रात जाऊन चांगला झेल टिपला. चमीरा ब्रूकच्या हाती झेल देऊन बाद झाला. कर्णधार दासून शनका बेथेलेच्या चेंडूवर फसला आणि बटलरने स्टंपिंग केलं. तीन विकेट्स गमावल्याने श्रीलंकेची स्थिती डळमळीत झाली.
लॉयम डॉसनच्या षटकात श्रीलंकेला दोनच धावा करता आल्या. बेथेलने शेवटच्या षटकात तीक्षणाला बाद केलं आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष केला.
सॅम करनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं

