IPL 2026 RCB vs SRH: आयपीएल २०२६ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा गोलंदाज जेकब डफीने पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या टॉप फलंदाजी फळीला सुरूंग लावला. जोश हेझलवूड दुखापतीमुळे सुरूवातीच्या सामन्यांमध्ये उपलब्ध नसल्याने जेकब डफीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आणि त्याने त्या संधीचे सोनं केलं.

सामन्याची सुरुवात करताना जेकब डफीने आपल्या पहिल्या षटकात केवळ ७ धावा दिल्या. त्यानंतर, आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला बाद करून आपली पहिली आयपीएल विकेट घेतली. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डफीने आणखी एक मोठा धक्का दिला. त्याने ट्रॅव्हिस हेडला माघारी धाडलं. यासह डफीने एकाच षटकात २ विकेट्स घेतल्याने हैदराबादची सुरूवात खराब झाली.

डफी इथेच थांबला नाही; आपल्या तिसऱ्या षटकात त्याने नितीश कुमार रेड्डीला बाद करून सनरायझर्स हैदराबादला तिसरा धक्का दिला. परिणामी, अवघ्या २९ धावांत तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्याने सनरायझर्स हैदराबादचा डाव पूर्णपणे कोसळला. जेकब डफीने सलग चार षटकं टाकून केवळ २२ धावांत तीन बळी घेतले. त्याने १३ चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्याचा अचूक टप्पा आणि दिशेमुळे फलंदाज विकेट्स गमावताना दिसले.

जेकब डफीसाठी २०२६ चा टी-२० विश्वचषक फारसा प्रभावी ठरला नाही, त्याने संपूर्ण स्पर्धेत केवळ तीन बळी घेतले. मात्र, त्याने आयपीएलमध्ये एक संस्मरणीय पदार्पण केलं आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरसीबीच्या वर्चस्वात त्याची प्रभावी गोलंदाजी निर्णायक ठरली. जोश हेझलवूडच्या पुनरागमनानंतर आरसीबीला जेकब डफीला संघाबाहेर ठेवणं कठीण असणार आहे.

जेकब डफीच्या कमालीच्या गोलंदाजीनंतर इशान किशनने वादळी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. कर्णधार असलेल्या इशानने ३८ चेंडूत ८ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांची वादळी खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३१ धावा करत संघाला चांगली साथ दिली. यानंतर अनिकेत वर्माने अखेरच्या षटकांमध्ये आपल्या षटकारांच्या फटकेबाजीने हैदराबादला २०० पार नेलं. अनिकेतने १८ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. यासह सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांत ९ बाद २०१ धावा केल्या आहेत.