Jai Moondra Record: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बेलफास्टमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंडकडून लोर्कन टकरने दमदार अर्धशतकी करुन संघाची धावसंख्या ९ गडी बाद १८२ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला आयर्लंडकडून पहिलाच सामना खेळत असलेल्या भारतीय वंशाच्या जय मुंद्राने पहिला मोठा धक्का दिला. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर संजू सॅमसनला बाद करत माघारी धाडलं आहे. यासह त्याच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या सामन्यात आयर्लंडकडून २ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मॅट हॉलार्ड आणि जय मुंद्रा या दोघांनी दमदार पदार्पण केलं. धावांचा बचाव करताना, भरभक्कम बॅटिंग लाईनअप असलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून अवघ्या १६ धावा जोडल्या.
भारतीय संघाने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकात १६ धावा वसूल केल्या. त्यानंतर आयर्लंडकडून दुसरे षटक टाकण्यासाठी जय मुंद्रा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने संजू सॅमसनला त्रिफळाचित करत माघारी धाडलं. यासह टी-२० पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर विकेट काढणारा तो आयर्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा कारनामा मॅथ्यू हम्फ्रीजने करुन दाखवला होता. त्याने २०२३ मध्ये बांगलादेशविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत सुरुवात केली होती. आता भारताविरूद्ध पहिली विकेट घेत जय मुंद्रा हा अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे.
कोण आहे जय मुंद्रा?
भारताविरुद्ध पदार्पणात दमदार कामगिरी करणाऱ्या जय मूंद्राचा जन्म राजस्थानच्या टोंकमध्ये झाला होता. त्याचं जन्मस्थान जयपूरपासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर आहे. जयला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. सुरुवात केली त्यावेळी तो वेगवान गोलंदाज होता. पण त्यानंतर त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. यासह त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी सुरु केली. त्यानंतर मास्टर्सचं शिक्षण करण्यासाठी तो आयर्लंडला गेला. शिक्षणासाठी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण पुन्हा एकदा क्रिकेटला एक संधी द्यावी, म्हणून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.२०२१ मध्ये आयर्लंडच्या एका क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश मिळवला. इथे त्याला आयर्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्याची संधी मिळाली. २०२३ मध्ये लेइनस्टर संघने आयरीश सिनियर कप या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. जय मूंद्रा या संघाचा भाग होता. भारतातून सुरु झालेला हा प्रवास, आता त्याला भारताविरूद्धच खेळण्याची संधी मिळाली आहे.
