James Anderson 5 wickets Haul in FC Cricket: वय हा फक्त एक आकडा आहे, हे इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सिद्ध करून दाखवलं आहे. ज्या वयात अनेक खेळाडू कोचिंग किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये स्थिरावतात, तिथे ‘स्विंगचा राजा’ जेम्स अँडरसन आजही मैदानावर फलंदाजांना आपल्या तालावर नाचवत आहे. वयाची चाळीशी ओलांडली तरी फिटनेस आणि जिद्दीच्या जोरावर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५ बळी टिपत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ४३ व्या वर्षीही अँडरसनचा हा ‘स्पेल’ पाहून तरुण गोलंदाजही थक्क झाले आहेत.

अँडरसनने काउंटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत एका डावात पाच बळी घेतले. त्याच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीत पाच बळी घेण्याची ही ५६वी वेळ आहे. लँकेशायरकडून खेळताना त्याने नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध ही कामगिरी केली. अँडरसनने १३ षटकांत ६४ धावा देऊन पाच बळी घेत आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणलं.

विरोधी फलंदाज अँडरसनच्या गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत. त्याने आघाडीच्या आणि मधल्या फळीला खिंडार पाडत महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याचा स्विंग आणि लाईन-लेंथ इतके अचूक होते की फलंदाजांकडे काही पर्यायच नव्हता. विशेष म्हणजे, या वयातही त्याचा फिटनेस आणि लय एखाद्या तरुण गोलंदाजाशी तुलना करण्यासारखी होती.

वयाच्या ४३व्या वर्षी अँडरसनची ही कामगिरी त्याची सर्वात मोठी ताकद दाखवते तो म्हणजे अनुभव. इतका प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फायदे त्याच्या प्रत्येक चेंडूत स्पष्टपणे दिसून येतो. त्याची कामगिरी तरुण गोलंदाजांसाठी एक धडादेखील आहे, केवळ वेगच नाही, तर नियंत्रण आणि सातत्यही तितकंच महत्त्वाचं आहे.

जेम्स अँडरसनची गणना जगातील सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी प्रभावी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही तो प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहे. ५६व्यांदा एका डावात पाच बळी घेणं, हे त्याच्या गोलंदाजीची धार अजूनही कमी झाली नसल्याचा प्रत्यत देणारी आहे. जेम्स अँडरसनची ही कामगिरी दाखवून देतं की वय हा केवळ एक आकडा आहे.