तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दात घशात घालणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून दात तोडण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे. अँडरसनने हे सारे सुनावणीदरम्यान मान्य केले असले तरी त्याला कोणतीही शिक्षा न झाल्याने क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहाराच्यावेळी जाताना अँडरसनने जडेजाला अपशब्द वापरत दात तोडण्याची धमकीही दिली आणि हीच गोष्ट अँडरसनने सुनावणीदरम्यान मान्य केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने जडेजाविरोधात अपील केले होते, ते पंचांनी फेटाळून लावले होते. पण तेव्हा अँडरसनने जडेजाला अपशब्द वापरले होते, त्यानंतर मैदानावीरल पंचांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शमवण्याचा प्रयत्न केला, पण अँडरसन काही थांबला नाही. या गोष्टीची कबुली मैदानावरील पंचांनी सुनावणीदरम्यान दिली होती.
‘‘जडेजाला सातत्याने अपशब्द वापरल्याचे आणि दात तोडल्याची धमकी दिल्याचे अँडरसनने सुनावणीदरम्यान मान्य केले. हीच गोष्ट बीसीसीआयने सुनावणीदरम्यान दाव्यासहित सांगितले होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ’’ असे अहवालात म्हटले आहे.
बीसीसीआय या वेळी दोन आघाडय़ांवर लढत होती. जडेजाविरोधातील तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी बीसीसीआयच्या वकिलांनी ही बाब सर्वासमोर आणली होती. पण अँडरसनच्या सुनावणीच्या वेळी बीसीसीआयच्या वकिलांना आयसीसीच्या वकिलाला या मुद्दय़ावरून प्रश्न विचारणे जमले नसल्याची माहिती पुढे येत आहे.

सबळ पुरावे नसल्याने अँडरसन निर्दोष – गॉर्डन
लंडन : इंग्लंडचा जेम्स अँडरसन निर्दोष सुटल्यावर साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले असले, तरी त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात आली नसल्याचा खुलासा आयसीसीने नियुक्त केलेले न्यायआयुक्त लुईस गॉर्डन यांनी केला आहे. ‘‘अँडरसनवर लावण्यात आलेल्या आरोपांबाबतचे पुरावे सादर करण्यात आले नाहीत आणि जे पुरावे सादर करण्यात आले ते सबळ नव्हते. त्यामुळे ठोस असे कोणतेही पुरावे नसल्याने अँडरसन निर्दोष सुटला,’’ असे गॉर्डन यांनी सांगितले.