रवि पत्की – sachoten@hotmail.com
एजबॅस्टन कसोटीत १९४ धावांचं लक्ष्य भारताला दिल्यावर इंग्लंडला जिंकण्याची जास्तं संधी होती. त्याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्लिश गोलंदाजांची गोलंदाजीची गुणवत्ता. कसोटी क्रिकेटला सर्वोच्च स्थान देणारे इंग्लिश लोक आणि खेळाडू आपल्या जलदगती गोलंदाजीच्या गुणवत्तेविषयी अत्यंत काटेकोर असतात. दिशा आणि टप्पा यावर हुकूमत आणि स्विंगवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य आत्मसात करण्याकरता ते जीव तोडून कष्ट करत असतात. तिथले माजी खेळाडू, समालोचक, पत्रकार हे देखील गोलंदाजाना त्यांच्या त्रुटींविषयी सतत सजग करून अल्पसंतुष्ट रहण्यापासून दूर ठेवत असतात.

जिमी अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स यांनी गोलंदाजी सुरू केली की डोळे झाकून चौथ्या स्टंपच्या आसपास सगळे चेंडू पडणार हे गृहित धरावे. स्टोक्सचे इन आणि आऊटस्विंग, ब्रॉडचा किंचित आखूड टप्प्याचा त्रासदायक दिशा धरून केलेला माऱ्यात विलक्षण सातत्य असते. पण अँडरसन, ब्रॉड, स्टोक्स या तीन पत्त्यातला एक्का म्हणजे अँडरसन. चेंडू टाकताना त्याच्या मनगटाच्या स्थितीवरून बरेचदा फलंदाज चेंडूची दिशा ओळखतो. पण त्याचे काही चेंडू गोलंदाजाला हतबल करतात. पहिला म्हणजे ऑफस्टम्पच्या अगदी जवळ पडलेला पुढे खेळू की मागे खेळू ही द्विधा मनस्थिती करणारा चेंडू (ज्या चेंडूवर त्याने अगणित विकेट्स काढल्या असतील) आणि दुसरा सिमवर बोट न ठेवता टाकलेला चेंडू. हा चेंडू इंग्लंडच्या ढगाळ हवेत बाहेरही जाऊ शकतो किंवा आतही येऊ शकतो. ह्या चेंडूच्या टप्प्याचे नियंत्रण देखील कमालीचे असते. ह्याच्या जोडीला ड्युक बॉलची ऐनवेळची नैसर्गिक दगाबाजी आणि चेंडू थोडा जुना झाल्यावर हुकमी रिव्हर्स स्विंग करण्याची ताकद. अँडरसनने ईनस्विंग टाकला तर तो ऑफस्टंपच्या बाहेरून चालू होणारा असतो. त्यामुळे त्याचे लक्ष्य मिडल स्टंपच असते. अँडर्सनने पॅडवर लेगस्टपंच्या दिशेने चेंडू टाकला आणि फलंदाजाला चार धावा बक्षीस दिल्या हा प्रसंग सहजासहजी आठवणार नाही. ह्या सगळ्यात सर्वात मोठी कौतुकाची बाब अशी की अशी अचूक आणि धारदार गोलंदाजी तो मेट्रोनोमच्या सातत्याने करत असतो. अँडरसनचा ऑफ डे कधी बघण्यात नाही. वयाची ३७ वर्षे झाल्यावर त्याला त्याची गुणवत्ता टिकवता येईल का अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. एजबॅसटॅन कसोटीत त्याने नेहमीच्या दर्जाची गोलंदाजी केली. त्याचे अजून एक वैशिट्य म्हणजे फिटनेस. फिटनेसवर खास लक्ष दिल्याने तो कुठल्या मालिकेला मुकल्याचे दिसत नाही. देशाकडून कसोटी खेळत रहाण्याची उत्कट इच्छा असल्याने त्याने आयपीएलची कंत्राटे दुर्लक्षित केली. या सर्व प्राथमिकतांचा आणि सातत्याचा परिणाम म्हणजे त्याची दैदिप्यमान कारकीर्द. आपण भावनेच्या भरात आपल्या गोलंदाजांची तुलना अँडरसन, ब्रॉड वगैरेंशी करतो. परंतु हे इंग्लिश गोलंदाज कोणत्या प्राथमिकता बाळगून आहेत, काय दर्जाचे अचूक श्रम घेतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोहली-अँडरसन सामन्याची तापलेली चर्चा:

कोहली अँडरसनला भारी पडेल का २०१४ प्रमाणे अँडरसन कोहलीला बकरा करणार यावर जागतिक स्तरावर वातावरण तापले आहे. असे दोन दिग्गज समोरासमोर येतात आणि परिपक्व झालेले असतात तेव्हा सामना बरोबरित सुटण्याची शक्यता जास्तं असते. अँडरसनचा दर्जा लक्षात घेता कोहली त्याची गोलंदाजी फोडून काढेल असे वाटत नाही. पूर्वी त्रासदायक ठरलेल्या अँडरसनच्या चेंडूंवर पुन्हा कोहली सापडतो का ह्याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. अशा लढाईत फलंदाजाने तांत्रिक बदल करून चेंडूचा सामना करायचा आणि गोलंदाजाने गोलंदाजी करताना मानसिक डावपेचातून (माईंड गेम्स) ग्रेट फलंदाजाला बाद करायचे असा हा सामना असतो. दोघेही प्रतिष्ठेची लढाई करतात. अशा स्थितीत कुणी कुणावर पूर्ण वर्चस्व न गाजवता सामना बरोबारित सुटतो असं दिसून येतं. उदा: रिचर्ड्स विरुद्ध लिली, गावस्कर विरुद्ध रॉबर्ट्स, तेंडुलकर विरुद्ध मॅकग्रा वगैरे…. इंग्लंडमधली सर्व परिस्थिती स्विंग गोलंदाजीला अनुकूल असल्याने सामना बरोबरित सोडवायला कोहलीला जास्तं परिश्रम करावे लागतील. अस्सल क्रिकेट रसिकाला ही परवणी ठरणार आहे हे नक्की.