पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने विक्रमाला गवसणी घातली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातील चौथा तर जलदगती गोलंदाजांपैकी पहिलाच खेळाडू ठरला. याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी ६०० बळींचा टप्पा गाठला आहे.

अँडरसनने ६०० बळींच्या टप्पा तर गाठला पण अवघ्या सहा चेंडूंमुळे त्याचा विश्वविक्रम हुकला. ६०० बळी मिळवण्यासाठी अँडरसनने ३३ हजार ७१७ चेंडू टाकले. तर मुथय्या मुरलीथरनने ३३ हजार ७११ चेंडूत ६०० बळी टिपले होते. अँडरसनने ६ चेंडू कमी टाकत ही किमया साधली असती, तर तो सर्वात जलद ६०० बळी टिपणारा गोलंदाज ठरला असता. या यादीत शेन वॉर्न (३४,९२०) तिसरा तर अनिल कुंबळे (३८,४९४) चौथा आहे.

अँडरसनला ६००व्या बळीसाठी खूप वाट पाहावी लागली. कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला. तेव्हा अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला उसळत्या चेंडूवर माघारी धाडले आणि ६०० वा बळी टिपला.