एक कसोटी सामना पाच दिवस खेळला जातो. त्यामुळे अशा सामन्यामध्ये फलंदाज जास्त आक्रमक न होता आरामात खेळण्याचा प्रयत्न करतात. परिणामी कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसारखी फटकेबाजी तुरळकच बघायला मिळते. कसोटीतील एका षटकात २०पेक्षा जास्त धावा केल्याचे बघायला मिळणे तर फारच दुर्मिळ दृश्य असते. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अशीही काही षटके पडलेली आहेत ज्यात फलंदाजांनी गोलंदाजांची जोरदार ‘धुलाई’ केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्यात असे दृश्य बघायला मिळाले. एजबस्टन कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटमधील एका षटकात सर्वात जास्त २८ धावा काढण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : ‘हा युवराज आहे की बुमराह?’, ब्रॉडची धुलाई केल्याने सचिन तेंडुलकरला पडला प्रश्न

जसप्रित बुमराहपूर्वी २००३मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या कसोटी सामन्यात ब्रायन लाराने दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनच्या षटकामध्ये २८ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर २०१३मध्ये जॉर्ज बेलीने पर्थमध्ये झालेल्या सामन्यात अँडरसनच्या एका २८ धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर २०२२मध्ये आफ्रिकेच्या केशव महाराजने जो रूटच्या एका षटकात अशीच कामगिरी केली होती. त्यानेही एका षटकामध्ये २८धावा जमवल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडने तर या सर्व गोलंदाजांना मागे टाकत एकाच षटकामध्ये तब्बल ३५ धावा उधळल्या आहेत.

भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. त्याच्याविरुद्ध युवराज सिंगने ६ षटकार मारले होते.

Story img Loader