तंदुरुस्तीच्या कारणास्तव अ‍ॅशेस मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकणार नसल्याची खात्री पटल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ३१ वर्षीय पॅटिन्सनने २१ कसोटी सामन्यांत ८१ बळी, १५ एकदिवसीय सामन्यांत १६ बळी आणि ४ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३ बळी घेतले आहेत. मात्र व्हिक्टोरिया संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. याच संघाकडून सराव करीत असताना काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

ब्रिस्बेन येथे डिसेंबर २०११मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पॅटिन्सनने मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या साथीने पदार्पण केले होते. कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना सिडनीत जानेवारी २०२०मध्ये न्यूझीलंडविरुद्धच तो खेळला. सप्टेंबर २०१५मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.