Jamie Overton, CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ २५१ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनने आक्रमक फलंदाजी करून १६ चेंडूत ३७ धावांची दमदार खेळी केली. त्याने संघाला विजयाच्या जवळ घेऊन जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तो बाद होऊन माघारी परतला. दरम्यान बाद होऊन डगआऊटमध्ये परतल्यानंतर, त्याने संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी सुरू असताना घडली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फिरकी गोलंदाज सुयश शर्मा गोलंदाजी करत होता. त्यावेळी जेमी ओव्हरटनने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच गेला, पण चेंडू हवा तितका लांब गेला नाही. त्यामुळे जेकब बेथेलने सोपा झेल घेतला. या झेलसह जेमी ओव्हरटनचा डाव ३७ धावांवर आटोपला.

बाद होऊन माघारी परतल्यानंतर तो संताप व्यक्त करताना दिसून आला. तो हेल्मेट काढून डगआऊटमध्ये गेला. त्याने आधी हेल्मेट काढून ठेवलं. त्यानंतर रागात हेल्मेट आपटलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन लागला आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना फिल सॉल्टने ४६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने २८ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. तर शेवटी रजत पाटीदारने नाबाद ४८ आणि टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांअखेर २५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जकडून सर्फराज खानने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर प्रशांत वीरने ४३ धावा केल्या. जेमी ओव्हरटनने ३७ धावांवर माघारी परतला. चेन्नईचा संपूर्ण डाव २०७ धावांवर आटोपला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला.