Ranji Trophy, Jammu Kashmir vs Bengal Semi Final: देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीर संघाने इतिहास घडवला आहे. दमदार कामगिरी करून जम्मू- काश्मीरने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना जम्मू- काश्मीर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात बंगालकडून मोहम्मद शमीने दमदार गोलंदाजी केली. पण बंगालचा संघ हा सामना जिंकू शकलेला नाही.बंगालने जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी १२६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जम्मू-काश्मीर संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात आकिब नबी जम्मू-काश्मीरच्या विजयाचा हिरो ठरला. आकिब नबीने या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना ८७ धावा खर्च करून ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ३६ धावा खर्च करून ४ गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून त्याने ९ गडी बाद केले. बंगालकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही लक्षवेधी कामगिरी केली. शमीने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ९० धावा खर्च करून ८ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याला २४ धावा खर्च करून १ गडी बाद केला. यासह त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना बंगालकडून सुदीप कुमार घरामीने १४६ धावांची दमदार शतकी खेळी केली. तर अभिमन्यू इश्वरनने ४९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बंगालने पहिल्या डावात ३२८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या जम्मू-काश्मीरला पहिल्या डावात ३०२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह बंगाल संघाने पहिल्या डावात २६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बंगालचा डाव घ्या ९९ धावांवर आटोपला. यासह जम्मू-काश्मीर संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अवघ्या १२६ धावांची गरज होती.हे आव्हान जम्मू-काश्मीर संघाने ४ विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.
सेमीफायनलमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करताना १२६ धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसतं. कारण बंगालकडे देखील अनुभवी गोलंदाज होते. बंगालच्या गोलंदाजांनी जम्मू-काश्मीरला आव्हानाच्या जवळ जाण्यापासून रोखण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी संयम दाखवत धावांचा यशस्वी पाठलाग केला. यासह हा सामना ६ गडी राखून जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
