पीटीआय, उलान-उदे (रशिया)

गेल्या वेळची कांस्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) आणि पदार्पणवीर जमुना बोरो (५४ किलो) यांनी आपापल्या लढती सहज जिंकत जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

जमुना बोरो हिने अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित ओदाद सोह हिच्यावर एकतर्फी विजय मिळवला. आफ्रिकन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोह हिला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी जमुनाने दिली नाही. तिसऱ्या मानांकित लव्हलिना हिने मोरोक्कोच्या औमायमा बेल अहबिब हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

गुरुवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत जमुनाला जर्मनीच्या उरसुला गोट्टलेब हिच्याशी झुंज द्यावी लागेल. गोट्टलेब हिने युरोपियन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या आणि बेलारूसच्या चौथ्या मानांकित युलिया अपानासोव्हिच हिला ३-२ अशा फरकाने हरवले. लव्हलिनाला सहाव्या मानांकित कॅरोलिना कोस्झेवस्का हिच्याशी दोन हात करावे लागतील. कोस्झेवस्का हिने उझबेकिस्तानच्या शाखनोझा युनूसोव्हा हिला हरवले.

आसामच्या जमुनाने थोडीशी सावध सुरुवात केली, पण सामन्याची रंगत वाढत गेली तशी ती अधिक आक्रमक होत गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये जमुना आणि सोह यांच्यात कडवी लढत रंगली; पण जमुनाने अचूक ठोसे लगावत सोहला नामोहरम केले. तिसऱ्या फेरीमध्ये तर जमुनाचेच वर्चस्व राहिले. ‘‘सुरुवात करताना मी काहीशी गोंधळले होते, पण अखेरीस विजयश्री खेचून आणल्याने आनंद होत आहे,’’ असे जमुनाने सांगितले.

लव्हलिनाने मागील लढतीचा अनुभव लक्षात घेता थोडेसे अंतर राखूनच अहबिबला ठोसे लगावण्याची रणनीती आखली होती. पहिल्या फेरीत थोडा आक्रमक खेळ केल्यानंतर अहबिब हिने जॅब्सचे अप्रतिम फटके लगावत लव्हलिनाला अडचणीत आणले. तुल्यबळ लढत सुरू असताना तिसऱ्या फेरीत लव्हलिनाने केलेला आक्रमक खेळ पंचांची दाद मिळवून गेला.