Jannik Sinner Wimbledon 2026 champion highlights: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जेनिक सिनरने रविवारी अलेक्झांडर झ्वेरेवचा ६-७ (७), ७-६ (२), ६-३, ६-४ असा पराभव करून ऑल इंग्लंड क्लबवर सलग दुसरे विम्बल्डन जेतेपद पटकावलं. सिनरचे हे पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत सिनरची ही पहिलीच स्पर्धा होती.

गेल्या वर्षीही सिनरने रोलांड गॅरोस (फ्रेंच ओपन) मधील पराभवाचं दुःख विसरून विम्बल्डन जिंकलं होतं. त्यावेळी फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये कार्लोस अल्काराझविरुद्ध तीन मॅच पॉईंट गमावल्यानंतर, त्याने विम्बल्डनच्या फायनलमध्ये अल्काराझलाच हरवून बदला घेतला होता. या विजयामुळे सिनरचे झ्वेरेववरील वर्चस्व अधिक घट्ट झाले असून, हा त्याचा जर्मन खेळाडूविरुद्ध सलग १० वा विजय आहे. झ्वेरेव्ह नुकतंच फ्रेंच ओपनमध्ये ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकून विम्बल्डनमध्ये दाखल झाला होता.

झ्वेरेवची दुखापत महाग पडली

सामन्याचा तिसरा सेट संपेपर्यंत दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. २ तास ४२ मिनिटांच्या खेळानंतर ३-३ अशा बरोबरीत असताना झ्वेरेवला सामन्यातील पहिला ब्रेक पॉईंट मिळाला. या पॉईंट दरम्यान सिनरने एक ड्रॉप शॉट खेळला आणि त्याचा पाठलाग करताना झ्वेरेव गवतावर घसरला. यादरम्यान त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तो कमालीचा अडचणीत दिसला. सिनरने तात्काळ नेट ओलांडून जात आपल्या प्रतिस्पर्ध्याला उठण्यास मदत केली. झ्वेरेवने खेळणे सुरू ठेवले असले तरी दुखापतीमुळे त्याला त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. यानंतर लगेचच त्याचा एक फोरहँड चुकला आणि संतापून त्याने रॅकेट फेकून दिलं.

सामन्यात पहिल्यांदाच त्याची सर्व्हिस ब्रेक झाली, यामुळे सिनरने ५-३ अशी आघाडी घेतली आणि सहजपणे सेट आपल्या नावावर केला. त्यापूर्वी,झ्वेरेवने पहिल्या सेटचा टायब्रेकर फोरहँड विनरसह जिंकत सिनरची सलग १४ सेट जिंकण्याची मालिका खंडित केली होती. हा सेट जिंकल्यानंतर त्याने आपल्या टीमच्या दिशेने पाहत जोरात गर्जना केली. सामन्यादरम्यान झ्वेरेव सातत्याने वेगाने सर्व्हिस करत होता, तर सिनरने अचूक आणि योग्य ठिकाणी टाकलेल्या एसेसवर भर दिला. मात्र, सामना जसजसा पुढे सरकला, तसतसे सिनरला झ्वेरेव्हची सर्व्हिस ओळखणं सोपं गेलं.

पॅरिसमधील पराभवानंतर चोख प्रत्युत्तर

फ्रेंच ओपनमधील निराशाजनक कामगिरीला आव्हान देत सिनर विम्बल्डनमध्ये उतरला होता. मे महिन्याच्या अखेरीस, अत्यंत उष्ण आणि दमट हवामानात सरळ सेटमध्ये विजयाच्या अगदी जवळ असूनही, जागतिक क्रमवारीत ५६ व्या क्रमांकावर असलेल्या जुआन मॅन्युएल सेरुंडोलोकडून सिनरला दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे त्याची सलग ३० सामने जिंकण्याची मालिकाही तुटली होती. त्या पराभवानंतर सिनरवर मिलान येथे वैद्यकीय उपचार सुरू होते आणि विम्बल्डनपूर्वी तो एकही अधिकृत सामना खेळला नव्हता. लंडनमधील त्याच्या मोहिमेची सुरुवात मियोमिर केकमानोविचविरुद्धच्या कठीण पाच सेटच्या लढतीने झाली होती, यामध्ये तो पहिला सेट हरला होता. पण त्यानंतर थेट फायनलपर्यंत त्याने एकही सेट गमावला नाही; यामध्ये उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचविरुद्ध मिळवलेल्या एका तडाखेबंद विजयाचाही समावेश आहे.