वृत्तसंस्था, कुमामोतो

जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे लक्ष्य सेनने घोडदौड सुरू ठेवताना पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तर दुसरीकडे एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले.

जागतिक स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने ३९ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असणाऱ्या सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला २१-१३, २१-११ असे पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. प्रणॉयला डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेकडून १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.

तेहविरुद्ध लक्ष्यने पहिल्या गेममध्ये ८-५ अशी आघाडी घेतली. तेहने खेळ लक्ष्यची आघाडी १०-९ अशी कमी केली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, गेम १४-१३ अशा स्थितीत असताना लक्ष्यने सलग सात गुणांची कमाई करत पहिला गेम आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्ये चांगली सुरुवात करताना लक्ष्यने ५-० अशी भक्कम आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत त्याने आघाडी ११-३ अशी वाढवली. यानंतर त्याने आपली हीच लय कायम राखत गेमसह सामना जिंकला. अन्य भारतीयांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.