वृत्तसंस्था, टोक्यो
दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्या हान यू हिला सरळ गेममध्ये नमवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सध्या सुरू असलेल्या हंगामातील सिंधूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणार्या सिंधूने दुसर्या फेरीच्या लढतीत क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या चीनच्या खेळाडूला २१-१६, २१-१४ असे नमवले. बिगरमानांकित सिंधूने अडखळत्या सुुरुवातीनंतर लय मिळवली. चांगल्या फटक्यांसह तिने हानवर वर्चस्व प्रस्थापित करताना पहिला गेम जिंकला. दुसर्या गेमच्या सुरुवातीलाच सिंधूकडे ८-० अशी आघाडी होती. आपली हीच लय कायम राखत तिने बाजी मारली.
पुढील फेरीत ३१ वर्षीय सिंधूसमोर जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे. अग्रमानांकित दक्षिण कोरियाच्या आन से यंगने दुसर्या फेरीच्या लढतीतून माघार घेतल्याने ओकुहाराला पुढे चाल मिळाली. तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला या मिश्र दुहेरीतील जोडीला चीनच्या फेंग यान झे आणि
हुआंग डोंग पिंग या अग्रमानांकित जोडीकडून ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात २०-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताकडून आता केवळ सिंधूचे आव्हान शिल्लक आहे.
