बचावपटू लॉरा बॅसेटची सामन्याच्या उत्तरार्धातील चूक इंग्लंडसाठी भलतीच महागात पडली. बॅसेटच्या स्वयंगोलमुळे गतविजेत्या जपानने इंग्लंडला २-१ अशी धूळ चारली आणि महिला विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली. सामना संपल्याची शिट्टी वाजली, तेव्हा बॅसेटचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. संपूर्ण संघाला हे दु:ख पचवणे कठीण जात होते. इंग्लंडचे प्रशिक्षक मार्क सॅम्पसन यांनी बॅसेटचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने त्वरित मैदान सोडले.
रविवारी जपान दोन वेळा विजेत्या अमेरिकेशी विश्वविजेतेपदासाठी सामना करणार आहे. माँट्रियल येथील उपांत्य सामन्यात अमेरिकेने जर्मनीला २-० असे हरवले होते. जपानची कर्णधार अया मियामाने ३३व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे संघाचे खाते उघडले, त्यानंतर ४०व्या मिनिटाला फारा विल्यम्सने इंग्लंडला बरोबरी साधून दिली. पहिल्या सत्रातील या थरारानंतर दुसऱ्या सत्रात निर्णायक गोलसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. हा सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची चिन्हे दिसत होती. परंतु भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला बॅसेटकडून स्वयंगोल झाला. त्यामुळे इंग्लंडचे विश्वचषक फुटबॉल स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
‘‘अथक प्रयत्नांमुळे इथपर्यंत मजल मारली; परंतु हे सारे काही आम्ही गमावले. त्यामुळे हे अश्रू स्वाभाविक आहे,’’ असे सॅम्पसन यांनी सांगितले.
२०११मध्ये जर्मनीला झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत जपानने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्या वेळी गटसाखळीमध्ये इंग्लंड या एकमेव संघाने जपानला २-० असे हरवण्याची किमया साधली होती. शनिवारी तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत इंग्लंड आणि दोन वेळा माजी विश्वविजेत्या जर्मनीचा सामना होणार आहे.