आर्लिंग्टन : डायची कामाडाने मोक्याच्या क्षणी केलेल्या गोलने विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात आशियाचे आव्हान उपस्थित करणार्‍या जपानने बलाढ्य नेदरलँड्स संघाला २-२ असे बरोबरीत रोखण्याची किमया साधली.पराभवाच्या छायेत असताना कामाडाकडून झालेल्या या गोलचे जपानसाठी विशेष महत्त्व असेल. नेदरलँड्स संघाकडून जपानचा पराभव अपेक्षित मानला जात होता.

मात्र, जपानच्या जिगरबाज खेळाने फुटबॉल तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरवले. जपानने पुढे जाऊन अव्वल १६ संघांच्या फेरीत प्रवेश मिळविल्यास या गोलचे महत्व प्रमाणित होईल. सामना संपत आला असताना सामन्याच्या ८९ व्या मिनिटाला कोकी ओगावाच्या कॉर्नर किकवर कामाडाने उत्कृष्ट हेडर करत हा गोल केला. तेव्हा जपानी चाहत्यांमध्ये एकच जल्लोष झाला. या बरोबरीमुळे नेदरलँड्स संघाने साखळी सामन्यांमधील आपली सलग १७ सामन्यांची अपराजित मालिका कायम ठेवली असली, तरी अखेरच्या क्षणी झालेल्या या गोलमुळे त्यांना निश्चित निराश केले असेल.

आमच्या खेळाडूंनी कमालीचा संयम राखला आणि शांत राहून संधीची वाट पाहिली. पण, लढाई अजून संपलेली नाही. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे जपानचे प्रशिक्षक हाजिमे मोरियासू म्हणाले. जपानने यापूर्वी २०२२ मध्ये कतार येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा अव्वल १६ संघांची फेरी गाठली होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीला नेदरलँड्सकडून व्हर्जिल व्हॅन डाइल आणि क्रायसेन्सियो समरव्हिल यांनी गोल केले, तर जपानच्या केइतो नाकामुराने एक गोल केला.