टोक्यो : संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा सुरक्षितपणे टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी दिली.

टोक्योमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असून सामान्य जनतेकडून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असतानाही हजारो खेळाडू, पदाधिकारी आणि पदाधिकारी ऑलिम्पिकसाठी टोक्योत दाखल झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर सुगा म्हणाले की, ‘‘संपूर्ण जग अडचणींचा सामना करत आहे. पण आम्ही मात्र ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी आतूर आहोत. संपूर्ण जगाला अभिमान वाटेल असा संदेश आम्ही ऑलिम्पिकमार्फत देऊ इच्छित आहोत. त्याचबरोबर जपानी लोकांच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत.’’

ऑलिम्पिकचे आयोजन करतानाच करोनाबाबतचा लढा देताना जपान अन्य देशांच्या तुलनेत काहीसा मागे पडला आहे. ‘‘आम्ही लसीकरणाला सुरुवात केली, पण आम्हाला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. आजमितीस फक्त २१ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान सुगा म्हणाले.

यावेळी ‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख यांनी फायझर आणि बायोएनटेक या लस उत्पादक कंपन्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ‘‘आयओसीच्या १०१ सदस्यांपैकी ७५ जण गेल्या जानेवारी महिन्यानंतर प्रथमच बैठकीला उपस्थित आहेत. क्रीडाग्राममधील ८५ टक्के खेळाडूंचे तसेच आयओसीच्या १०० टक्के पदाधिकाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.’’