Jason Gillespie Viral Video: आयपीएल २०२६ बरोबरच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला सुरूवात होणार आहे. आयपीएल २८ मार्चपासून तर पीएसएल २६ मार्चपासून सुरू होईल. फ्रँचायझी लीगमध्ये खेळाडू कोच संघात दाखल होताच व्हीडिओ तयार केले जातात. यासाठी संघ बरीच तयारी करत असतात. चाहत्यांचं देखील या व्हीडिओला भरभरून प्रेम मिळतं. पण यादरम्यान पीएसएलमधील जेसन गिलेस्पी यांनी हे मूर्खासारखे व्हीडिओ मी तयार करणार नाही, असं थेट फ्रँचायझीच्या व्हीडिओमध्ये सांगितलं.

पाकिस्तानच्या कसोटी संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये परतले आहेत, मात्र यावेळी ते पाकिस्तान सुपर लीगमधील हैदराबाद किंग्समेन संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रीय संघासोबतच्या वादग्रस्त कार्यकाळातून घेतलेल्या धड्यांच्या आधारावर त्यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, हा त्यांचा नवा कार्यभार “फक्त कामापुरताच” असेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गिलेस्पी यांनी संघाच्या हॉटेलमध्ये होणाऱ्या पारंपरिक “अरायव्हल व्हिडिओ”मध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडत असे करण्यास नकार दिला. गिलेस्पी हॉटेलमध्ये उभे असताना कॅमेरा त्यांच्याकडे पॅन केला जातो, हे पाहताच गिलेस्पी म्हणतात, “मी खाली येणार नाही. माझ्याकडे खूप काम आहे. मी त्या मूर्खसारख्या अरायव्हल व्हिडिओसाठी शूट करणार नाही,” असं गिलेस्पी यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले.

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जेसन गिलेस्पी यांनी कठोर भूमिका घेतली असली, तरी पाकिस्तानातील खेळाडूंसोबत पुन्हा काम करण्याबाबत त्यांनी उत्साह व्यक्त केला आहे. “हैदराबाद किंग्समेन संघाचा भाग बनताना मला खूप आनंद होत आहे. पुढे बघण्यासारखं खूप काही आहे आणि काम सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे त्यांनी जानेवारीत ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले होते.

गिलेस्पी यांचा PSL संघात सामील होण्याचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला, कारण पाकिस्तान राष्ट्रीय संघासोबत त्यांचा कोचिंगचा कार्यकाळ अचानक संपला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबत झालेल्या वादानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेच्या अगदी काही दिवस आधीच रेड-बॉल प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.